नांदेड| कामगार, कर्मचारी, कष्टकरी श्रमिकांच्या विरोधी भूमीका घेवून मालक धार्जीणे कायदे बनविणारी सत्ता बदलल्याशिवाय श्रमिकांचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून 2024 च्या निवडणुकीत श्रमिकांनी सत्ता परिवर्तन करावे, असे आवाहन ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) चे राज्य सरचिटणीस कॉ.श्यामजी काळे यांनी केले.
आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचार्यांचा एकदिवशीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना कॉ.काळे म्हणाले की, 102 वर्षे प्रदीर्घ संघर्ष करुन आयटकने कामगार, कष्टकर्यांच्या हिताचे कायदे सत्ताधार्यांकडून करवून घेतले. 2014 पासून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने कामगार हिताचे 44 कायदे रद्द करुन मालकधार्जीण्या चार कामगार संहिता लागू करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. किमान वेतन, कंत्राटी निर्मूलन कायदा, पगारी रजा, आठ तासाचा दिवस असे अनेक कायदे आयटकने संघर्ष करुन मिळवून घेतले.
आज या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरत आहे. महागाई, पेट्रोलजन्य पदार्थांची दरवाढ यासारख्या सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांवरुन सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्यासाठी मंदिर, मस्जिद, भोंगे, हनुमान चालीसा सारखे भावनिक मुद्दे उपस्थित करुन लोकांचे लक्ष विचलित करीत असल्याचा आरोप कॉ.काळे यांनी यावेळी केला. त्यामुळे येणार्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व श्रमिकांनी संघटीत होवून सत्ता परिवर्तन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलतांना भाकपाचे जिल्हा सचिव ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी संघटना ही सततची चलणारी प्रक्रिया आहे. कामगार, कष्टकर्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटन शक्ती वाढवावी, असे आवाहन केले. कामगारांनी काम सरो, वैद्य मरो असे धोरण न बाळगता सातत्याने संघटनेच्या कार्यात, आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. नांदेड जिल्ह्याला कामगार चळवळीचा इतिहास आहे.
यावेळी शालेय पोषण आहार संघटनेचे राज्य सरचिटणीस विनोद झोडगे, कॉ.मुगाजी बुरुड, जिल्हाध्यक्ष कॉ.नामदेव शिंदे, कॉ.गजानन घोडे, कॉ.हानिफाबी ईस्माईल, कॉ.शेवंताबाई काकडे, कॉ.शोभा बेहरे, कॉ.किशन पवळेकर, कॉ.संगिता वैद्य, कॉ.केशव वाघमारे, कॉ.साईनाथ दासरवाड, कॉ.संभयाप्पा विभुते, कॉ.बालाजी मेतकुलवार, कॉ.नामदेव नंदलवाड, कॉ.ललीताबाई बिल्लाळे यांच्यासह शालेय पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.