‘आप’ ने फोडली हदगाव शहरातील नागरिकांच्या समस्येला वाचा -NNL


हदगाव।
हदगाव शहरातील वॉर्ड क्रं. १७, भारतनगर नवी आबादी तामसा रोड हदगावच्या नागरिकांना पायी चालण्यास बरोबर रस्ता नाही, त्यामुळे लहान बालके, जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक, अपंग नागरिकांचे पायी चालत बाजारात जाणे किंवा इतर कामासाठी घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी व इतर कामासाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. नागरिकांना इकडे- तिकडे भटकंती करून कसेबसे पाणी आणावे लागत आहे आणि इतर आंघोळीची, कपडे धुतलेले पाणी दोन्ही बाजूस नाल्या नसल्यामुळे सरळ रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अगोदरच येथील जमीन काळीची चिखल होणारी असल्यामुळे रस्ता बारा महिने चिखलमय राहात आहे.


या नगरातील लहान बालकांना जवळ अंगणवाडी नसल्यामुळे शिक्षण व संस्कारापासून वंचित रहावे लागत असून त्यांचे बालपण जाग्यावरच खुंटत आहे. या भागात घंटागाडी येत नाही. घनकचरा जागोजागी साचलेला आहे सर्वत्र घाण पसरलेली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे सतत आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. येथील बहुतांश नागरिक रोजमजुरी करून आपली उपजीविका भागवित असतात. या बाबीकडे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आमदार, खासदार लक्ष देण्यास तयार नाहीत. तुमची गल्ली अधिकृत नाही याची नोंद नाही, तुम्हाला घरकुल किंवा इतर सुविधा देऊ शकत नाही म्हणून नागरिकांचा अपमान केला जातो. 

या नागरिकांचे मतदान जमते, येथील नागरिक शहरातील सर्व बांधकामे, रोजगार करतात ते जमते फक्त यांना अधिकार म्हणून रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधा देण्याचे जमत नाही अशी येथील अधिकारी आणि पदाधिकारी यांची मानसिकता मानवतेला काळिमा फासणारी ठरली आहे. यांना योग्य त्या नागरीकरणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि यांचे जीवनमान उंचावले पाहिजे म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने त्याची दखल घेऊन त्यांच्या रास्त मागणीचे निवेदन मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, संबंधित नगरसेवक, नगराध्यक्ष यांना देऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे.

यावेळी आम आदमी पक्षाचे हदगाव तालुकाअध्यक्ष नागोराव गंगासागर, सचिव शिवाजी जोजार, विलास कांबळे यांच्यासह अनेक स्त्री -पुरुष नागरिक उपस्थित होते. शासन व प्रशासनाच्या कार्यवाहीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबतीतही पाठपुरावा करण्याचे वचन आम आदमी पार्टीच्यावतीने नागरिकांना देण्यात आले आहे. यावेळी नागरिक समाधानी असल्याचे दिसून आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी