नांदेड| भूमि अभिलेख कार्यालयात मालमत्ते बाबत अचूक आणि योग्य माहिती ठेवणे अभिप्रेत असते. मात्र नांदेड शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मात्र मयत व्यक्तीच्या नावे दुसऱ्यांदा नोटीस काढण्याचा प्रताप कार्यालयाने केला आहे.
शहरातील मौजे वजिराबाद येथील नगर भूमापन क्रमांक 3454 आणि 3457 चे मालक व ताबेदार श्री. सुधाकर सखारामपंत पाठक होते त्यांचा मृत्यू दिनांक 27 मार्च 2021 रोजी झाला. मृत्यू झाल्यानंतर जागेची चौकशी संदर्भात उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने सुधाकर पाठक नावे नोटीस काढली होती. त्या वेळेस त्यांचे वारसदार देविदास पाठक यांनी त्यांच्या मृत्यूची कल्पना कार्यालयास लेखी कळवली होती.
लेखी माहिती कळवली असताना सुद्धा परत तिच चूक करून परत चौकशी/स्थळ पाहणी बाबत नोटीस काढणे हे निरलाजस्पद आहे. देविदास पाठक यांनी मालमत्तेवर वारसा आधारे जो पर्यंत नाव परिवर्तन होत नाही तोपर्यंत कोणतीही कामे करू नये अशी मागणी केली आहे. वारसा आधारे नाव परिवर्तन करण्यासाठी त्यांनी अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे. यासोबतच दिनांक १९ एप्रिल रोजी काढलेली नोटीस २ मे ला भेटते या नोटीस मागे विलंब जाणीवपूर्वक केला का हाही प्रश्न उपस्थित होत आहे.