सोयाबीन बियाण्यातील स्वयंपूर्णतेबाबत नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अग्रभागी - जिल्हाधिकारी डॉ. विपिन -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे बाबत केलेल्या नियोजनामुळे आज शेतकऱ्यांनी स्वयंपूर्णता मिळवून इतिहास रचला आहे. कृषी विभागामार्फत यासाठी गावपातळीवर भर दिला जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

कासारखेडा येथे  प्रगतिशील शेतकरी बाबाराव गोविंदराव आढाव यांच्या शेतात आज कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पूर्व तयारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, कासारखेडा गावच्या सरपंच सुरेखा शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमनशेटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले , जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख , प्रा. माणिक कल्याणकर, तालुका कृषि अधिकारी नांदेड प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती. 

चांगले बी बियाणे शेतकऱ्यांनी तयार करून त्याची उगवण क्षमता तपासून घेतली पाहिजे. घरच्या घरी या गोष्टी करता येणाऱ्या आहेत. मदतीला गावपातळीवर कृषी सेवक, अधिकारी आपल्यासाठी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गावातील उन्हाळी सोयाबीन लागवड व खरीप हंगामासाठी उपलब्ध सोयाबीन बियाणे बाबत आढावा घेतला. 


शेतीसाठी येणाऱ्या खर्चात बी- बियाणे यासाठी येणारा खर्च वरचेवर वाढत आहे. जे बी -बियाणे आपल्याला पूर्वापार ज्ञानाच्या आधारे जपता येण्यासारखे आहे त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. यातूनच शेतकरी आपले बीज स्वातंत्र्य व बियानातील स्वयंपूर्तता प्राप्त करू शकतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केला. "कृषी विभागाचा एकच नारा, बियाण्यामध्ये गाव स्वयंपूर्ण हमारा." असे प्रतिपादन करून त्यांनी  गावातील बियाण्याची गरज गावातच पूर्ण झाली पाहिजे असे सांगितले. 

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बियाणे बाबतीत केलेल्या नियोजनाबाबत त्यांनी प्रशंसा  करून शेतकऱ्यांना येणाऱ्या  खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून जिल्ह्यामध्ये 7 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन लागवड झाल्याचे सांगून केलेल्या सोयाबीन बियाणे साठवणूक बाबत माहिती दिली. जिल्हा कृषि विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टे यांनी जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा सुरळीत पुरवठा करणार असल्याचे सांगून, भेसळ बियाणे व खते विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे सूचित केले.

कासारखेडा गावचे कृषी सहायक वसंत जारीकोटे यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोगा विषयी प्रात्यक्षिक करीत माहिती दिली. कापूस संशोधन केंद्र नांदेड येथील शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी रासायनिक सरळ खतांमधून मिश्र खते तयार करण्या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. माणिक कल्याणकर यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवून बीज प्रक्रियेचे अनन्यसाधारण महत्व विशद केले. डॉ. देविकांत देशमुख यांनी रासायनिक कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी विषयी माहिती देऊन रासायनिक कीटक नाशकांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगितले. 

प्रशिक्षणाचे यशस्वीतेसाठी उमेश आढाव, ज्ञानेश्वर आढाव, तानाजी शिंदे, चंद्रशेखर शिंदे, सोनाजी आढाव, राजाराम शिंदे, दशरथ आढाव, सतिश आढाव, अश्विन कुमार शिंदे, गोपाळ आढाव, पूरभाजी आढाव,राजू हिंगोले, योगाजी देशमुख,आदींनी परिश्रम केले. या कार्यक्रमास कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे सह नांदूसा गावचे उपसरपंच राजू धाडवे, विनायक धडावे, चिखली बू . गावचे  भगवान शेजूळे, प्रकाश जोगदंड, कासारखेडा गावातील ओंकार राहते, किशोर शिंदे, राष्ट्रपाल झिंजाडे, रितेश आढाव, अमन आढाव, मुंजाजी आढाव, शिवम आढाव, बालाजी आढाव, दत्ता आढाव आदींसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थित मान्यवर यांनी शेतकरी यांच्या सोयाबीन प्लॉटची पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील आभार मानले. हा कार्यक्रम फेसबुकवर लाइव्ह दाखविण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी