नांदेड| प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये अनेक प्राणी असतात. जसे की उंदीर, बेंडूक, सर्प, ससा इ. या सर्व प्राण्यांना हाताळण्यासाठीचे एक वेगळे कौशल्य असते. प्रयोगशाळेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते आत्मसात करणे गरजेचे असते. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुल आणि वसमत येथील कुसुम जैवशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रयोगशाळेतील प्राणी कसे हाताळावेत’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, संचालक डॉ. शैलेश वाढेर, डॉ. बालाजी मद्रेवार, डॉ. पायल राठोड, डॉ. सचिन क्षीरसागर हे होते.
या कार्यशाळेमध्ये प्राण्यांचे विच्छेदन कसे करावे?, रक्त संकलन कसे करावे?, प्राणी हाताळताना कोणती काळजी घ्यावी? इ. सर्व बाबतीत प्रत्यक्षिके करून दाखविण्यात आली. या कार्यशाळेस परिक्षेत्रातील १०० पेक्षा अधिक विद्यार्थी, संशोधकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निशा दरगड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विजय नवघरे, प्रा. प्रदिप देशमुख, डॉ. शशिकांत ढवळे, प्रा. शिवराज शिवपुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.