पळसपूर येथील शेतकऱ्यांनी दिली गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार
हिमायतनगर, अनिल मादसवार| शेततळे अनुदान योजना २०२१ अंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये शेततळे खोदकाम केले. त्यानंतर संबंधित अभियंता यांनी मोजमाप घेतले. यास वर्षाचा कालावधी लोटला असून, या शेततळ्यात पाणीही जमा झालेला आहे. मात्र शेततळे केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची रक्कम मिळाली नसून परस्पर हि रक्कम उचलून घेऊन हडप करण्यात अली असल्याचा संशय व्यक्त करत चौकशी संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्येकडे केली आहे.
कितीही खडकाळ शेती असली तरी पाणी असेल तर शेतीमध्ये खूप उत्पन्न काढता येते. मुरमाड कोरडवाहू जमीन असलेल्या ठिकाणी विहीर जरी खोदली तरी त्यास पाणी लागण्याची कमी शक्यता असते. त्यामुळे शासनाने शेततळे अनुदान योजना आणली. त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत पळसपूर ता हिमायतनगर येथील शेतकऱ्यांनी मंजुरी मिळाल्यानंतर पैनगंगा नदीकाठावरील पळसपूर येथील शेतकरी रावसाहेब वानखेडे यांनी गट क्रमांक १९७ मध्ये शेततळे खोदले. त्याचा फायदा असा झाला कि शेततळ्यात आजही पाणी आहे. मात्र या शेतकऱ्यांस अद्याप शेततळ्यासाठी मंजूर झालेले कोणतेही अनुदान मिळालेले नाही.
पळसपूर ता हिमायतनगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात २०२१ मध्ये मंजूर झालेल्या शेततळ्याचे खोदकाम शेतकऱ्यांनी केले. त्यानंतर रोजगार सेवक, उपअभियंता गाडे यांनी शेततळ्याचे मोजम करून मस्टरही तयार केले. परंत्तू अद्यापही शेतकऱ्यांना मस्टरवरील २ लक्ष २ हजार ५८४ रुपयाच्या अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेततळ्याची रक्कम, संबंधित ग्रामसेवक कासटवार, रोजगार सेवक व इतरांनी मिळून हडप केली असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. शेततळ्यासाठी शासनाकडून मिळणारी रक्कम न देता परस्पर उचलून घेऊन आमच्यावर अन्याय केला असल्याची तक्रार गटविकास अधिकारी हिमायतनगर यांना दिली आहे.
या गैरव्यवहार प्रकारची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि शेततळ्यासाठी मंजूर रक्कम तातडीने देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आम्हाला या विरोधात आंदोलनाचं हत्यार उपसावे लागेल अशी प्रतिक्रिया नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना रावसाहेब सीताराम वानखेडे रा.पळसपूर यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी दिली आहे.