नांदेड| भोंग्याआडून महाराष्ट्रात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे कटकारस्थान सुरू आहे. अशा गलिच्छ राजकारणाचे बहुसंख्येने बहुजन समाजातील तरुणच बळी पडतात. त्यामुळे स्वतःचे आयुष्य आणि भविष्य अशा राजकारणी लोकांच्या नादी लागून उध्वस्त करुन घेऊ नये.
भोंग्याच्या नादी न लागता आजच्या नवयुवक व तरुणांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे असे प्रतिपादन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते बुद्ध भीम संयुक्त जयंती निमित्त भीमसूर्याचा वादळवारा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भिक्खू श्रद्धानंद, भंते सुनंद भंते सुमेध, भंते शिलभद्र यांच्यासह भिक्खू संघ, विधानपरिषदेचे आ. अमर राजूरकर, महापौर जयश्री पावडे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. मोहनअण्णा हंबर्डे, नगरसेवक प्रतिनिधी विलास धबाले, नगरसेवक सुभाष रायबोले, संदिप सोनकांबळे, संयोजक किशोरदादा भवरे, आयोजक माजी महापौर शिला भवरे, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, सिद्धांत इंगोले, आप्पाराव नरवाडे, अनिल नरवाडे, अनिकेत भवरे, प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
शहरातील जंगमवाडी भगिरथ नगर परिसरात किशोरदादा भवरे मित्र मंडळाने बुद्ध भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना पंय्याबोधी थेरो म्हणाले की, शिक्षणाचे कुळाचा उद्धार होतो. इतर वाईट नादाला न लागता उच्च शिक्षण घेऊन मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावल्याच पाहिजेत. देशात कोणत्या ना कोणत्या कारणाने दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आपण ओळखले पाहिजे. सर्वांनी बंधुभावाने वागले पाहिजे. पंचशिलेचे पालन केले तर देश समृद्ध होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करुन झाली. पुष्पपूजन आणि दीपप्रज्वलनानंतर भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर आणि त्यांच्या संचाने बहारदार गाणी गायली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोरदादा भवरे मित्रमंडळाने परिश्रम घेतले.