ग्रामस्थांनी चोरट्यास पकडून दिला चोप
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात मटका, जुगार, यासह विविध अवैध्य धंद्याबरोबर चोरी, लूटमार, घरफोडी, दुचाकी चोरि, विना परवाना हत्यार बाळगणे, चाकू हल्ला व खुनाच्या घटनासह अन्य गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. या घटनांचा तपास लावण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरल्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी उलट वाढतच चालले आहे. अशीच एक घटना दि.१७ च्या रामप्रहरी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे घडली असून, हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी दुचाकी चोरट्याना पकडून चोप दिला. दरम्यान एक चोरटा फरार झाला असला तरी एकास पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाणी असून, ४६ ग्रामपंचायतीचा कारभार शहरात असलेल्या पोलीस ठाणे अंतर्गत चालविला जात आहे. या याठिकाणी तालुक्याच्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांचे संख्याबळ कमी असून, येथे नियुक्तीला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय नसल्याने नाईलाजाने अनेक जण आपल्या सोयीच्या ठिकाणी राहवून ये-जा करत कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोठेही घटना घडल्यास अथवा नाईट पेट्रोलिंग करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी शहरासह तालुक्यात मटका, जुगार, देशी-विदेशी दारूची विनापरवाना विक्री आणि यासह विविध प्रकारच्या अवैध्य धंद्याबरोबर चोरी, लूटमार, घरफोडी, हत्यार बाळगणे, चाकू हल्ला करून खुनाच्या घटना घडल्याने हिमायतनगर शहर हे गुन्हेगारीचे केंद्र बनत आहे. असे असताना देखील स्थानिक नियुक्त अधिकारी हे जास्तीत जास्त सोयीच्या पद्धतीने कामे करत असल्याने गुन्हेगारीला वाव मिळत असल्याचे शहर व ग्रामीण भागातील जनतेतून बोलले जात आहे.
परिणामी दिवसागणिक होत असलेल्या घटनांमुळे नागरिकांनी झोप उडाली असून, दि.१७ च्या रामप्रहरी म्हणजे सकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथील शेतकरी खंडू उमाजी चुकारे वय ७० वर्ष यांची दुचाकी कुणीतरी दोन अज्ञात चोरटयांनी संगनमताने चोरून नेत असताना काहींनी बघितले. लागलीच त्यांचा पाठलाग करून कामारी येथील नागरिकांनी दुचाकी चोरट्याना पकडून चांगलेच चोपले. दरम्यान एक चोरटा फरार होण्यात यशस्वी झाला असून, एकाला नागरिकांनी पकडून ठेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सकाळी १० वाजता हिमायतनगर पोलिसांनी कामारी येथे घटनास्थळी जाऊन त्या दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवून विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्हा कबुल करून आपले नावे सांगितली.
या प्रकरणी शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून जनार्धन शिंदे, अमोल रणखांब रा.लोहरा, ता.उमरखेड, जी. यवतमाळ या दोघांच्या विरीधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात कलम ३७९, ५११, ३४ भादंवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्या आदेशाने बिट जमादार पोटे हे करीत आहेत. पोलिसांनी गावकर्यांनी पकडून दिलेल्या या चोरट्यांचा कसून तपास करावा. आणि हिमायतनगर शहर व तालुक्यात झालेल्या चोरीचा तपास लावण्यात यावा अशी मागणी कामारी ग्रामस्थांसह तालुक्यातील नागरीकातून केली जात आहे.