भारतीय संविधानावर आधारित सत्ताकारण म्हणजे बुद्धशासन - अॅड. विजय गोणारकर -NNL


नांदेड|
भारतीय संविधान हे सर्वोच्च असून त्यात आंबेडकरवाद रोपण केलेला आपल्याला दिसतो. बुद्धकाळानंतर दीक्षित झालेल्या अनेक राजांनी आपले राज्य सर्वकल्याणी बुद्ध विचारसरणीप्रमाणे चालविले. आज देशात तशी परिस्थिती नाही. पुर्णतः भारतीय संविधानावर आधारित राजकारण आणि सत्ताकारण झाले तर आंबेडकरवाद केंद्रबिंदू मानणाऱ्या बुद्धशासनाची निर्मिती होईल असे स्पष्ट प्रतिपादन येथील आंबेडकरी विचारवंत अॅड. विजय गोणारकर यांनी मांडले. 

ते येथील महाविहार परिवाराच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी भंते शीलरत्न, भंते संघप्रिय, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एन. डी. गवळे, इंजि. भीमराव हटकर, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, आयोजक यशवंत गच्चे आदींची उपस्थिती होती. महाविहार परिवार नांदेडच्या वतीने माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सह्योग नगर नांदेड ,येथे आंबेडकरवाद केंद्रबिंदू मानून बुद्धशासनाची निर्मिती या विषयावर नांदेड येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अँड विजय गोणारकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

तद्वतच दलित पॅंथर व मास मुव्हमेंट या लढाऊ संघटनाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत योगदान देणारे ज्येष्ठ कार्यकर्ते एन डी गवळे सर यांचा चळवळीतील सक्रिय सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविहार परिवाराचे ज्येष्ठ सदस्य पी. एम.  इंगोले सर अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलतांना  अॅड. गोणारकर म्हणाले की, देश संक्रमणावस्थेतून जात आहे. देशातील बहुसंख्य लोकांसमोर राजकीय, सामाजिक, आर्थिक तथा सांस्कृतिक समस्या आहेत. आंबेडकरवादाला प्रखर विरोध होत आहे. आंबेडकरवाद केंद्रबिंदू मानून अंतिम ध्येय बुद्धशासन असावे असा एकही राजकीय पक्ष सध्यातरी अस्तित्वात नाही. हे जर निर्माण करावयाचे असेल तर एकतेची शक्ती दाखवून बौद्धांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान प्रास्ताविका यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविहार परिवाराच्या याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. जी. पवार यांनी केले . व्याख्यात्यांचे स्वागत एस. टी. पंडीत यांनी केले तर एन. डी. गवळे  यांचा  महाविहार परिवारातर्फे शाल, पुष्पहार, कपडेरुपी आहेर आणि ग्रंथभेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय शांतीदूत प्रतिष्ठानचे डी. पी. गायकवाड व स्तंभलेखक भैय्यासाहेब गोडबोले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचलन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ सदस्य रमेशजी कोकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साहेबराव पुंडगे, राहुल कोकरे, लक्ष्मण गरजे, अशोक गायकवाड, जनार्दन आठवले, राजेश बिराडे आदींनी परिश्रम घेतले.

आंबेडकरी चळवळीतील त्यागाची किंमत मोजता येत नाही - एन. डी. गवळे

आंबेडकरी चळवळ सर्वव्यापी आहे. अनेकांच्या त्यागातून आणि बलिदानातूनच ही चळवळ उभी राहिली आहे. येणाऱ्या विविध पिढ्यांना जोडणारा आंबेडकरवाद हा दुवा आहे. हा विचार सतत प्रवाहित राहण्यासाठी अनेक प्रामाणिक आणि प्रखर आंबेडकरवादी कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. ही चळवळ स्वतःचा लाभ करून घेण्यासाठी नाही तर समाजाला विचार देणारी आहे. आंबेडकरी चळवळीतील त्यागाची किंमत मोजता येत नाही असे ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एन. डी. गवळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी