नांदेड। मागील काही दिवसापासून शहरासह जिल्ह्यात वनविभागाची खाकी वर्दी घालून रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदाचे बनावट ओळखपत्र तयार करून फसविणाऱ्या तोतया वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास दि.२४ मे रोजी रात्री नांदेडच्या लातूर फाटा परिसरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून वनविभागाचा लोगो असलेली दुचाकी आणि खाकी वर्दी पोलिसांनी जप्त केली आहे.
जिल्ह्यात जंगल परिसरात वन अधिकारी म्हणून फिरणारा हा भामटा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना व वन विभागालाही हातावर तुरी देत होता अखेर हा भामटा वन अधिकारी लातूर फाटा, दूध डेअरी रोड येथे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना कळताच त्यांनी आपले सहकारी अधिकारी फौजदार दत्तात्रय काळे यांच्या पथकाला रवाना केले. तेंव्हा मुळचा निवघा तालुका हदगाव येथे राहणारा कपिल पाईकराव नावाचा हा तोतया अधिकारी वन विभागाची वर्दी अंगावर चढवून स्कुटीवर लातूर फाटा भागात उभा टाकला होता.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःकडे असलेले फिरते पथक ओळखपत्र दाखवले. ओळखपत्र व नावाची खात्री वनविभागात केल्यानंतर हा अधिकारी आमच्याकडे नाही याची खात्री पटल्याने पोलिसांनी त्याला अटक केली असून या भामट्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे.