नांदेड| महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21 व सन 2021-22 या चार वर्षांचा एकत्रित देण्यात येणार आहे. या चार वर्षाच्या पुरस्कारांसाठी इच्छूक व्यक्ती व संस्थांनी चार वेगवेगळे विहित नमुन्यातील अर्ज बुधवार 20 एप्रिल 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे रितसर आवश्यक योग्य त्या माहितीसह सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराची नियमावली 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आली आहे. यानुसार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन, साहित्यिक क्षेत्रात काम करत असलेले व्यक्ती, संस्थेच्या कामाची दखल घेऊन त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार, साहित्यिकांनी पुढे यावेत या उद्देशाने हा पुरस्कार व्यक्ती व सामाजिक संस्थेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकुण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. नियमावलीबाबत 8 मार्च 2019 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.