नांदेड। शहरात खून, लूटमार, दरोड्यासह चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत, आज मील रोडवर असलेल्या टीव्हीएस शोरुम जवळ स्वतंत्र मराठवाडा या वर्तमानपत्राच्या संपादकाचा भररस्त्यावर खून करण्यात आल्याची घटना आज रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सोमेश काँलनी भागातील रहिवासी असलेले प्रेमानंद भगवानराव जोंधळे वय 35 वर्ष हे स्वतंत्र मराठवाडा या वर्तमान पत्राचे संपादक आहेत. रात्री ते आपल्या घरातून बाहेर निघाले व मील रोडवर चालत जात होते. यावेळी त्यांच्या घरासमोर राहणारा कृष्णा हातांगळे हा अचानक समोर आला आणि त्याने आपल्याकडील चाकूने प्रेमानंद जोंधळेच्या पोटात आणि छातीवर चाकू भोसुकून सपासप वार केले. आणि घटनास्थळाहून पळून गेला.
हा प्रकार रात्री 9 वाजेच्या सुमारास भर रस्त्यावर घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले, शहरात घडणाऱ्या अगोदरच्या घटनांचा तपास लावण्याच्या कामात पोलीस व्यस्त असतांना पुन्हा एक खुनाची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांना कठोर पाऊले उचलून आरोपींना जेरबंद करत कायदा व सुव्यवस्थेचा धाक ठेवण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना सुरक्षा द्यावी लागणार आहे. ही घटना कोणत्या कारणाने घडली याचा शोध पोलीस घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वजीराबाद ठाण्यातील पोलीस निरीक्षक जगदीश भांडरवार, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोचला असून, तपास सुरू आहे. वृत्त लिहिपर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
