संपत्तीच्या कारणावरून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने घेतला गळफास
नांदेड| संपत्तीच्या कारणावरून नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात येणाऱ्या मौजे हिब्बट येथील एकाने भावा-भावातील वाटणीवरून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून शेतात झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रमाकांत हनुमंत कागणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हिब्बट शिवारातील शेतात रमाकांत कागणेने गळफास घेण्यापूर्वी मोठा भाऊ गोविंद कागणे आणि वहिनी अनुसया या संपत्तीचा वाटा देत नसल्याचे म्हटले आहे. आमची संपत्ती नांदेड, हिब्बट, देगलू्रमध्ये असून मला संपत्तीतून बेदखल करत आहेत. उलट आता मी मेल्यानंतर तो दारूच्या आहारी गेला होता. कर्जबाजारी झाला होता असे सांगितले जाईल,' असेही त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 'परंतु, माझ्यावर झालेले कर्ज माझी पत्नी फेडेन. कारण मला शेती आहे... मी आता तुम्हाला सोडून जात आहे. मला माफ करा,' असे शेवटी म्हणून त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
व्हिडिओ पाहून मुखेड ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, पोलिस उपनिरीक्षक नरहरी फड, पोलिस कर्मचारी चंद्रकांत वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह मुखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी मृत रमाकांत हनुमंत कागणे यांच्या पत्नी श्यामला यांच्या फिर्यादीवरून मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.