सामाजिक, आर्थिक, व राजकीय न्यायाचे साधन म्हणजे भारतीय संविधान - डॉ. एल बी डोंगरे -NNL


हिमायतनगर|
देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी संविधानाची आवश्यकता असते. भारतीय संविधान हे जगाच्या पातळीवर सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानामध्ये सर्व जाती, पंथ, धर्म, लिंग भेद, महिला-पुरुष, सण-उत्सव या  विविधतेतून नटलेल्या देशातील लोकांना एका सूत्रामध्ये बांधण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केल आहे. भारतीयांना जीवन जगण्यासाठी ऊर्जा संविधानाच्या माध्यमातून मिळते. म्हणून संविधानाचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे. त्या निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधान वाचले पाहिजे आणि त्याचा प्रचार- प्रसार केला पाहिजे. हे आपले राष्ट्रीय कर्तव्य नव्हे तर  काळाची गरज आहे. असे ते म्हणाले. 

आपल्या मनोगतातून पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय बहुजन समाज अनेक वर्षांपासून गुलामी मध्ये जीवन जगत होता. या गुलामीच्या दलदलीतून बाहेर काढण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आणि त्यामुळेच आज दलित समाज व सर्व जाती धर्मातील स्त्रिया आज अनेक वेग वेगळ्या पदावर जाऊन सन्मानाचे पद उपभोगताहेत. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करताना दिसतात. डॉ. बाबासाहेबांनी स्त्रियांना आरक्षण देऊन स्त्रियांचा बहुमान केला. त्याच बरोबर स्त्रियांसाठी विशेष हिंदू कोड बिल मांडण्याचा प्रयत्न केला. आहे म्हणूनच स्त्रिया आज मुक्तपणे जिवन जगत आहेत. असे सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. एल. बी. डोंगरे त्यांनी केले.


हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या तर प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. बी. डोंगरे हे लाभले होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे स्टॉफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम व तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिकारक महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. या प्रसंगी स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचा अभ्यास करावा व त्यातील तरतुदी ची जाणिव करुन घ्यावी. असे ते म्हणाले. व तसेच कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या ओजपूर्ण वाणीतून आगोदर बोललेल्या मान्यवरांच्या मनोगताचा ओझरता परामर्श घेतला. व अनेक उदाहरणांसह भारतीय संविधानावर विचार मांडले. 

या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विद्यार्थी निलेश चटणे यांनी केले तर आभार व्यंकटेश यशवंतकर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक -प्राध्यापिका व  कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी