बियाणी हत्या प्रकरणात एसआयटीची माहिती; धर्माबादमधून एकाला अटक
नांदेड| संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पोलिस करत असतानाच अचानक दि.१९ एप्रिल रोजी एक निनावी पत्र बियाणी यांच्या घरी आले. त्यात बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचला होता. पांडुरंग येवले या व्यक्तीचे नाव त्या पत्रात लिहिले होते. परंत्तू असे पत्र खोडसाळपणाने पाठवल्याची माहिती विशेष पोलिस पथकाने (एसआयटी) दिली. हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला अटक झाली आहे.
संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणाला आठ दिवस उलटून गेले असताना देखील या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. काही सुगावा मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत संजय बियाणी यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्राने पोलिस यंत्रणेची झोप उडवली होती.
संजय बियाणी यांच्या कुटुंबीयांनी एसआयटीकडे हे पत्र दिले होते. याबाबतची चौकशी केली असता हे पत्र धर्माबाद तालुक्यातील आटाळा येथील ७४ वर्षीय विठ्ठल संतराम सूर्यवंशी या व्यक्तीने खोड॒साळपनाणे पाठवल्याचे समोर आले आहे. पांडुरंग येवले यांना या प्रकरणात गुंतवण्यासाठी व त्यांना अटक व्हावी म्हणून त्याने हा प्रकार केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले.
पांडुरंग व विठ्ठुल यांच्यात वैयक्तिक शेतीचा वाद सुरू आहे. याच उद्देशाने पांडुरंग यांच्या नावाने परभणी येथून हे पत्र पाठवण्यात आले होते. चौकशीअंती पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गोंड यांच्या तक्रारीवरून विमानतळ ठाण्यात पात्र पाठविणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे करत आहेत. दरम्यान, या हत्ये प्रकरणात आतापर्यंत ४ पेक्षा अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.