अहमदपूर। जि.लातूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील दोन सख्ख्या भावांचा पंढरपूर- मोहोळ रस्त्यावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रोकडा सावरगाव येथील रहिवासी व सध्या सोलापूर येथील मुख्यालयात पोलिस काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले दयानंद अण्णाराव बेल्लाळे ( वय 30 ), पत्नी दीपाली अण्णाराव बेल्लाळे ( वय २५ ), लातूरला मार्केटिंग व्यवसाय करणारे त्यांचे भाऊ सचिन आण्णाराव बेल्लाळे (वय ३२), भावजय स्वाती सचिन बेल्लाळे, मुलगी त्रिशा ( ८) व मुलगा श्लोक ( एक ) आपल्या मारूती कारने सोमवारी (ता.चार) पंढरपूरहून दर्शन घेऊन सोलापूरकडे येत होते.
दरम्यान मोहळजवळील सारोळे फाटा येथील एका धाब्यासमोर उभा असलेल्या ट्रकला मागील बाजूने धडक बसल्याने यात दोन्ही सख्ख्या भावाचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूर येथील खाजगी सीएनएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आण्णाराव सुर्यवंशी यांना दयानंद व सचिन हे दोनच मुलं होती.
दयानंद बेल्लाळे हे चार वर्षांपासून पोलीस दलात शिपाईपदावर काम करीत होते, तर सचिन बेल्लाळे हे एक वर्षापासून लातूरला मार्केटिंग व्यवसाय करीत होते. अशातच बेल्लाळे कुटुंबीयांनी कार खरेदी केली होती. दोन्ही मुलांचा एकाच वेळी अपघातात मृत्यू झाल्याने बेल्लाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांवर रोकडा सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.