पुणे। स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या वतीने 'विज्ञान आख्यान' ही विज्ञान-नाटक विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे दरम्यान ही कार्यशाळा दररोज ४ ते ६ या वेळात होणार आहे. वैज्ञानिक शोधांचा प्रवास नाट्यातून मांडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रचे कार्यवाह महेश पोहनेरकर,उपाध्यक्ष धनंजय काळे आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संस्थापक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या कार्यशाळेत अभिनय कौशल्य,विज्ञान कथा,नवीन तंत्रज्ञान यावर चर्चा करण्यात येणार आहे.विज्ञान नाटिकांचे लिखाण,दिग्दर्शन यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
निवडक नाटिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.९ वर्षांपुढील वयोगटासाठी ही कार्यशाळा असून सुनील चौधरी,मंदार पटवर्धन हे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.कार्यशाळेचे उदघाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेते विज्ञान चित्रपट दिग्दर्शक नंदन कुध्यादी, विज्ञान भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव डॉ.मानसी माळगावकर यांच्या उपस्थितीत १५ एप्रिल रोजी सावरकर स्मारक ( कर्वे रस्ता ) येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या कार्यशाळेत मुलांना केतकी गोडबोले (भरतमुनीचे नाट्यशास्त्र),मंदार परळीकर(सावरकर आणि विज्ञान), दिगपाल लांजेकर(छत्रपती शिवराय आणि विज्ञान) या विषयावरील मार्गदर्शन मिळणार आहे. रामानुजन यांच्यावर नंदन कुध्यादी यांनी केलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता माहितीपट दाखवला जाणार आहे.