पूर्णा| भारतीय संविधान हे सामाजिक न्यायाचा पाया आहे, ज्याद्वारे समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करण्यात येते. असे प्रतिपादन प्रा.बाबासाहेब भूकतरे यांनी केले. ते श्री.गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा (जं.) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त " भारतीय संविधान आणि मूलभूत हक्क" या विषयावर ऑनलाइन वेबिनार मध्ये ते बोलत होते.
वेबिनारचे उदघाट्न संस्थेचे सचिव मा.श्री.गोविंदराव कदम यांनी करून वेबिनारला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. राजकुमार हे होते तर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड चे प्रा.बाबासाहेब भूक्तरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ओंकार चिंचोले यांनी केले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.पुष्पा गंगासागर यांनी केले. प्रा.बाबासाहेब भूक्तरे यांनी आपले विचार व्यक्त करताना संविधान निर्मितीचा पूर्व इतिहास सांगून संविधानाचे महत्व विषद केले आणि मूलभूत हक्का विषयी सविस्तर माहिती दिली. डॉ.बाबासाहेबांनी देशातील समस्त जनतेसाठी आणि शोषित ,पीडित, वंचित, श्रमिक, दलितांच्या न्याय हक्कासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधानाने सर्वांना समता, न्याय,हक्क आणि जीवन जगण्याची समान संधी उपलब्ध करून दिली आहे.
समाजातील सर्वच समस्याची उकल करण्याची क्षमता भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिली आहे. भारतीय जनतेला सामाजिक न्याय देऊन सर्वांगिन विकास करण्याची ताकत भारतीय संविधानाने दिलेली आहे.त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानव कल्याणाचे महानायक ठरले असून भारतीय संविधान हा मानव कल्याणाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे प्रा.बाबासाहेब भूक्तरे यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी आपले विचार व्यक्त करताना भारतीय संविधानातील सर्वोच्चता, देशाची एकता व सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणतंत्रात्मक राज्यपद्धती, संघराज्य रचना, धर्मनिरपेक्षता,व्यक्तिस्वातंत्र्य,संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, समतेचे तत्व, मूलभूत अधिकार ,आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक सर्व तत्वे संविधानाने प्राप्त झाले असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमधिकारी डॉ.संतोष चांडोळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.फातेमा शेख, डॉ.संजय दळवी,डॉ.गंगधर कापुरे,डॉ.शिवसांब कापसे,डॉ. रविद्र राख,डॉ. विजय पवार, डॉ.अजय कुऱ्हे,डॉ.सोमनाथ गुंजकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. संजय कापुरे,श्री. मंचक वळसे,श्री. नागोराव सावळे तसेंच महाविद्यालयातील विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.