स्वाभीमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडी मधून बाहेर - राजू शेट्टींची घोषणा -NNL


कोल्हापूर|
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं आज जोरदार धक्का देत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे.  

आज स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरुन लढाई लढणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारला सोडचिठ्ठी देणार असल्याचं म्हटलं जात होतं. तसे संकेतच राजू शेट्टी यांनी दिले होते.

अखेर आज राजू शेट्टी यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. "मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो की मविआ आणि आमचे सगळे संबंध संपले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ त्यांना ही परिस्थिती सांगू. दिल्लीवाल्यांनी फसवलं आणि मुंबईवाल्यांनीही फसवलं. आता आम्हाला आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय", असं राजू शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आता राजू शेट्टींची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार होते, मात्र राज्यपालांनी आक्षेप घेतल्याने त्या यादीतूनही त्यांचे नाव वगळण्यात आले होते. तेव्हापासून शेट्टी आणि महाविकास आघाडी यांच्यातला संघर्ष वाढला होता. महाविकास आघाडीने दिलेले वचन पाळले नाही, असा थेट आरोप राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज राजू शेट्टी यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी