नांदेड| वेद हे सर्वधर्मांचे मूळ असून वेद आणि वेदांग ही भारत देशाच्या प्राचीन संस्कृतीची ओळख आहे. वेद आणि वेदागांची सेवा म्हणजे प्राचीन संस्कृतीचे जनच होय. हाच दृष्टीकोन समोर ठेवून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे प्रतिपादन शौर्य परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेदमूर्ती गजानन कळगावकर यांनी केले. ते शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित विविध परीक्षाच्या निमित्ताने बोलत होते.
सामाजिक आणि शैक्षणिक अग्रेसर असलेल्या येथील शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याज्ञीक , ज्योतिष संस्कृतच्या परीक्षा चक्रधरनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नुकत्याच घेण्यात आल्या. या परीक्षेत 260 जणांनी सहभाग नोंदवला.
माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे, प्रसिद्ध उद्योगपती संजय औरादकर, उद्योजक देवदत्त देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेदमूर्ती गजानन कळगावकर, प्रमोद आलेगावकर, पांडुरंग विष्णुपूरीकर, मनोज पेठवडजकर, धनंजय हळदेकर, विकास धर्माधिकारी , धोंडोंपंत शिराढोणकर, सतीश पोदार, गिरीश पुजारी आदींच्या प्रयत्नांनी घेण्यात आलेल्या परीक्षेला 260 जणांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 160 जणांनी ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. यशस्वी पुरोहितांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.