जिल्हा परिषद स्थापनेला साठ वर्षे पूर्ण ०१ में रोजी हिरक महोत्सव कार्यक्रम -NNL

पालकमंत्री अशोक चव्हाण करणार मार्गदर्शन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ


नांदेड|
महाराष्ट्र राज्यात 1 मे 1962 रोजी त्रिसदस्यीय कार्यपद्धती अस्तित्वात येऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या स्थापनेस 1 मे  रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. 

या निमित्ताने राज्यातील जिल्हा परिषदअंतर्गत हिरक महोत्सव समारंभ साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार उद्या रविवार दिनांक 1 मे रोजी नांदेड जिल्हा परिषदेत  सकाळी 8.30 वाजता हिरक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.  

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले असून उपस्थितींना ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.  

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच उद्या 1 मे रोजी सकाळी 11.30 वाजता पुणे जिल्हा परिषदअंतर्गत हीरक महोत्सवानिमित्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा मागील 60 वर्षाचा मागोवा आणि भविष्यातील आव्हाने याविषयी राज्यसभेचे सदस्य शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. 

या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री पुणे तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब व फेसबुकद्वारे करण्यात येणार आहे. हे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था नांदेड जिल्हा परिषदेत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिरक महोत्सव कार्यक्रमात उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी