लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र हेच ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ !

इतर कोणत्याची देशाचा इतिहास जितका प्राचीन आणि पराक्रमाने भारलेला नाही, तितका या भारतभूमीचा आहे. रामकृष्णादि अवतारांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत या भूमीने आदर्श राज्यव्यवस्था पाहिली. अनेक यातना सहन केल्यावर वर्ष 1947 मध्ये मिळवलेल्या स्वातंत्र्यानंतरही प्रत्येक भारतियाची अपेक्षा ही रामराज्याचीच म्हणजे आदर्श राष्ट्राची होती. अजूनही आदर्श राज्य म्हटले की, डोळ्यांसमोर ‘प्रभु श्रीरामचंद्रांचे राज्य’ अथवा ‘शिवरायांचे हिंदवी स्वराज्य’ उभे रहाते. आज हिंदूंची दुःस्थिती पहाता भारताला गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा लेखप्रपंच !

केवढा हा दैवदुर्विलास !
देशात कोरोनाची स्थिती बिघडवण्यात तबलिगी जमातने मोठा हातभार लावला. देश-विदेशातून आलेल्या अनेक तबलिगींनी कायदा मोडला म्हणून त्यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करत आहे. ‘तबलिगींचे सूत्र म्हणजे खरेतर हिमनगाचे टोक म्हणावे’, अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या आपल्याच देशातल्या काश्मिरी हिंदूंना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यासाठी तब्बल 3 दशके प्रयत्न करण्यात आले नाहीत, पण हजारो किलोमीटर दूर असलेल्या म्यानमारमधून हुसकावून लावण्यात आलेले रोहिंग्या मुसलमान मात्र जवळ असलेल्या बांगलादेशमध्ये न जाता भारतातील जम्मू मध्ये अलगद विसावले. जिथे एका शहरातून दुसर्‍या शहरात गेल्यावर जर आपल्याकडे पैसे नसतील, तर आपली व्यवस्था होणे कठीण होऊन जाते, तिथे हे परदेशी लोक बेकायदेशीरपणे भारतात घुसतात, आतपर्यंत पोहोचतात आणि सुखा-सामाधानाने आयुष्य जगतात ! भारतासमोरील खरेतर हा अत्यंत जटील प्रश्‍न आहे. आतंकवाद्यांच्या ‘जनाज्या’ला हजारोंच्या घरात गर्दी करणार्‍या देशद्रोह्यांना आणि याच देशात जन्माला आलेल्या ‘तुकडे-तुकडे गँग’ला देशातील काही राजकारण्यांचे समर्थन जगजाहीर आहे. अन्यथा भारतविरोधी मानसिकता या देशात निर्माण होणे शक्य नाही. जिथे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात जाऊन केलेल्या पराक्रमावरही शंका घेणारे महाभाग या देशात आहेत, तिथे वेगळी अपेक्षा करायलाच नको !

काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर देशाच्या आणि बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या संदर्भात असलेल्या कर्तव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. ‘सीएए’ आणि ‘एन्आर्सी’ यांसारख्या देशहितासाठी असलेल्या कायद्यांना आज विरोध करण्यामागे अल्पसंख्यांक समाजाचे लांगलूचालन आहे, हे वेगळे सांगायला नको. मूळ राज्यघटना आपल्या मनाला वाटेल तशी अलोकशाही मार्गाने दुरुस्त करत वर्ष 1976 मध्ये त्यात इंदिरा गांधींनी ‘सेक्युलर’ शब्द घुसवला आणि त्यानंतर याच ‘सेक्युलर’ शब्दाचा कोणताही अर्थ अधिकृतपणे न स्वीकारता हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचा किंबहुना देशाच्या हिताचा वारंवार बळी दिला गेला. आजही तो दिला जात आहे. देशहितासाठी एखादा कायदा करतांना देशात दंगलसदृश स्थिती निर्माण होत असेल, तर सध्या चीनने भारतावर आक्रमण केल्यास आणि चीनला उघड पाठिंबा देणार्‍या पाकिस्ताननेसुद्धा त्यात सहभाग घेतला, तर आपले पराक्रमी सैनिक सीमेवर शत्रूला पाणी पाजतील, याची खात्री आहे; परंतु पाकिस्तानला समर्थन देणार्‍या देशांतर्गत शत्रूंचा सामना करायला आम्ही किती सिद्ध आहोत, याचा विचार प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने करायला हवा. इसिससारख्या आतंकवादी संघटनेत सहभागी व्हायला याच देशातून पैसे आणि सुशिक्षित माणसे पुरवली जातात, यातच सर्व काही आले.

हिंदुद्वेषी नि ‘सेक्युलरी’ आतंकवाद !
भारतात जनतेसाठी तयार केलेले कायदे, नियम हे जणू आमच्यासाठी बनवलेलेच नाहीत, असा काहीसा विचार देशातल्या पंथांध शक्तींचा आहे. किंबहुना अशा पंथांची मूलभूत शिकवण ‘पंथ हाच सर्वोच्च असल्या’ची असल्याने त्यांच्याकडून याहून वेगळी अपेक्षा केली जाऊ शकत नाही; पण अन्य देशांत त्या त्या देशाचे कायदे आणि नियम पाळणारे हे पंथांध केवळ भारतात अधिक कट्टर होतात. अनेक वर्षांनंतर राममंदिराचा प्रश्‍न न्यायालयाने निकाली काढल्यानंतरही मंदिराच्या पायाभरणीवरून वादंग निर्माण होतो. एकीकडे आतंकवाद्यांच्या जनाज्याला होणार्‍या गर्दीला, आतंकवाद्यांचे वकीलपत्र घेणार्‍यांना, इफ्तारच्या पार्ट्यांना विरोध केला जातो. दुसरीकडे फाळणीच्या वेळी आम्हाला आमचा प्रांत हवा म्हणून मुसलमानांना पाकिस्तान देऊन टाकल्यावर उरलेली भूमी स्वाभाविकपणे खंडित भारतातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंचीच आहे; पण प्रत्येक ठिकाणी कितीही अन्याय अत्याचार झाला, तरी ‘हिंदूंनीच जुळवून घ्यावं कारण ते सहिष्णू आहेत’, ही मानसिकता निर्माण करण्यात राज्यकर्ते यशस्वी झाले. 

हिंदूंच्या सनातन धर्मात दिलेली पराक्रम, शौर्य, चातुर्य याची परंपरा जन्मापासूनच हिंदूंच्या मनातून नाहीशी व्हावी, यासाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करून देण्यात आली. अहिंसा, सहिष्णुता, परोपकार, त्याग या संज्ञांचा योग्य अर्थ बाजूला ठेऊन स्वार्थी राजकारण्यांना अपेक्षित असलेल्या भलत्याच व्याख्या शिकवून हिंदूंना नेभळट करण्यात आले. त्यामुळे आज हिंदूंच्या धार्मिक भावनांचा कोणीही अवमान केला, देवतांची नग्न चित्र काढली, नाटक, चित्रपट, जाहिरात यांतून देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन केले, तरी हिंदू निष्क्रियच राहिले. त्यामुळे हाच परिणाम हिंदूंच्या राष्ट्रीय भावनांवर सुद्धा झाला. त्यामुळे ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा’, ‘राष्ट्रगीत चालू असतांना उभे रहा’, अशा सामान्य गोष्टीही हिंदु जनजागृती समितीला काही वर्षे समाजात जाऊन शिकवाव्या लागल्या. आपल्या धार्मिक आणि राष्ट्रीय भावना या 24 घंटे जागृत रहायला हव्यात, तरच राष्ट्राची पर्यायाने आपली प्रगती होते, हे आम्हाला समजून घ्यायची वेळ आली आहे. आज या देशात देशाच्या हितासाठी बोलणारे नि कार्य करणारे ‘फॅसिस्ट’ म्हणवले जातात. ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा उभा करून हिंदु संघटनांना संपवण्याचे कारस्थान रचले जाते आणि याउलट देशविरोधी कारवाया करणार्‍या लोकांसाठी तथाकथित विचारवंत ‘पुरस्कार वापसी’ करतात. हे षड्यंत्र आपण समजून घ्यायला हवे.

‘राष्ट्रहित सर्वोपरि ।’ अथवा ‘तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे ।’, अशी उदात्त नि संपूर्णत: निष्कलंक, नि:स्वार्थी आणि राष्ट्रनिष्ठ विचारधारा असलेल्या हिंदु समाजाने देशाच्या प्रगतीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. तरी अशा समाजाच्या हितासाठी ‘लोककल्याणकारी हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे काळाची आवश्यकता आहे. हेच मानवता, व्यवहार, तर्क आणि विज्ञान या सर्व स्तरांवर समर्पक आहे आणि वस्तुनिष्ठही ! अर्थात् हिंदु राष्ट्राची ही संकल्पना आध्यात्मिक स्तरावरील असणे अपेक्षित आहे. त्यानेच त्याचा खर्‍या अर्थाने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. हा विचार हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी सांप्रतकाळात सर्वप्रथम मांडला. ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दही अस्पृश्य असतांना आज लोकसभेत आणि विदेशातही याची चर्चा होत आहे. अनेक वर्षे प्रलंबित असणारे धर्म आणि राष्ट्र यांपुढील अनेक प्रश्‍न काळाच्या ओघात निकाली लागत आहेत.

या प्रयत्नांमध्ये गती आणण्यासाठी त्याला ‘आध्यात्मिक हिंदुत्वा’चा पाठिंबा लाभला आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देश-विदेशातील कृतीशील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख गेली 8 वर्षे गोवा येथे होत असलेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने एकत्र येत असून कृतीशील वैचारिक देवाण-घेवाण करत आहेत. हिंदु राष्ट्राचा समान धागा पकडून प्रत्येक महिन्याला राष्ट्रीय समस्यांवर एकत्रितपणे कायदेशीर आंदोलन करणे, धर्मजागृतीपर सभा घेणे, न्यायालयीन लढाई लढणे, संस्कृतीची जोपासना करणे, हिंदूसंघटन करणे इत्यादी अनेक प्रकारे एकत्रित रूपाने राष्ट्रव्यापी कार्य करत आहेत. त्याला उत्तम प्रकारे यशही मिळत आहे. यास या अधिवेशनांची फलश्रुती म्हणता येईल. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येणे शक्य नाही; परतुं हिंदु राष्ट्राच्या ओढीने प्रेरित असणार्‍या हे सर्व हिंदु धर्माभिमानी ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदु राष्ट्राचा जागर करणार आहेत. आपल्यालाही या अधिवेशनात सहभाग घेऊन ‘खारीचा नव्हे, तर वाघाचा वाटा उचलायचा आहे’, याची खूणगाठ मनाशी बांधून ठेवायची आहे. ठेवायचीच नाही, किंबहुना त्यासाठी कृतीशील व्हायचे आहे. जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।

श्री. रमेश शिंदे
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी