बीड। शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि मुंबई येथील शिवसेना कार्यकर्ते राजू नाईक यांच्या विरोधात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची पहिली तक्रार बीड येथे रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आली आहे.
खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांनाबंटी - बबली असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी संबोधिले तर त्यांच्या पुढे एक पाऊल टाकत वाकोली, मुंबई येथील शिवसेना कार्यकर्ते राजू नाईक याने "बंटी - बबली चोर - चांभार" असा अवमानकारक जातीयवादी शब्द वापरला. यामुळे समस्त चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या. याचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी तातडीने फेसबुकवर लाईव्ह येत उपरोक्त प्रकरणी जाहिर निषेध नोंदविला. तसेच कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले.
या आवाहनास प्रतिसाद देत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश सल्लागार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा कांबळे - पाटील यांनी तातडीने बीड शहर पोलीस स्टेशन गाठले व खा. संजय राऊत आणि राजू नाईक यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार शनिवार दि. २३ एप्रिल २०२२ रोजी रात्री ११:०० वाजता दाखल केली. यामुळे समता परिषदेचे सर्वत्र कौतुक होत आहे.