नागरिक, शेतकरी, प्रवाश्यानी मानले आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे आभार
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरापासून ते घारापुर फाट्यापर्यंतच्या जीवघेण्या रस्त्यामुळे पावसाळ्यात विदर्भ - मराठवाडा वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक अपघात झाले. याबाबतची भीषणता आणि प्रवाशी नागरिक, शेतकरी यांचे हाल लक्षात घेऊन मागील दोन वर्षात नांदेड न्यूज लाइव्हने १२ ते १० वेळा वृत्त प्रकाशित केले होते. त्याची आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दखल घेऊन अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे. अर्धापूर- फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या हिमायतनगर घारापुर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दि.०७ एप्रिल रोजी केला आहे. या रस्त्याचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकदाराकडून होणार असून, पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण होईल अशी रास्ता अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अर्धापूर-फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने घारापुर फाट्यापासून मोठा रस्ता झाला आहे. परंतु हिमायतनगर ते घारापुर फाटा या ३ किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यात रस्त्याची होणारी जीवघेणी अवस्था पाहून या रस्त्याला कोणीही वाली नाही...? असा संतापजनक प्रश्न नागरिक शेतकऱ्यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली जात होती. तर अनेक वेळा संबधित विभागाने व तालुक्याचे आमदार महोदयांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन जीवघेण्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जात होती.
गेल्या दोन वर्षपासून या रस्त्याची अशी दयनीय अवस्था असल्याने अल्पसा पाऊस झाला कि, या रस्त्यातील खड्ड्यात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी रस्त्याने ये-जा करताना दुचाकीस्वार, शेतकरी, जीप, कारचे चालक व प्रवाशी यांची घसरगुंडी होऊन अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता केंव्हा संपतो याची वाट पाहात प्रवास करावा लागत होता. तर काहीजण अश्या जीवघेण्या रस्त्याची कटकट नको म्हणून हदगाव मार्गे उमरखेड असा लांबचा प्रवास करत होते. याबाबत नांदेड न्यूज लाईव्हने मृत्यूचा सापळा बनलेल्या या जीवघेण्या रस्त्याबाबतचे अनेकवेळा वृत्त प्रकाशित करून कुंभकर्णी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र २ वर्षपासून कोणीही लक्ष दिले नाही. या रस्त्याबाबतची व्यथा आ.जवळगावकरांनी लक्षात घेऊन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कानावर टाकून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे रस्त्याच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरीकातून त्यांचे आभार मानले जात आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे होणार त्रास कमी होईल- गेल्या दोन ते तीन वर्षापासन रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांसह आम्हा शेतकऱ्यांची दैना झाली होती. रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेमुळे अनेकजण घसरून पडून अपंग झाले आहेत. तसेच विदर्भ - मराठवाडयाच्या दालन-वळणाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र आता सुरु झालेल्या या ३ किमी रस्त्याच्या कामामुळे प्रवाश्याना सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार असून, दळण वळण आणि शेतकरी, नागरिकांच्या अडचणी यामुळे सुटणार असून, खड्डेमय रस्त्यामुळे त्रास कमी होणार आहे. अशी प्रतिक्रिया अनेक शेतकरी वाहनधारक व नागरिकांनी व्यक्त केली.