नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
नांदेड, अनिल मादसवार| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 11 जून 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 11 ते 15 जून 2021 या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
जलसंधारण उपाययोजना पारंपारिक, अपारंपरिक या विषयावर वेबिनार संपन्न
भू.स.वि.यं. सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 निमित्त भूजल विषयक तांत्रिक बाबींची संपूर्ण माहिती व जनजागृती होण्यासाठी भूजलाशी निगडीत विविध विषयावर वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. आज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक आर.व्ही. पवार यांनी “जलसंधारण उपाय योजना, पारंपारिक व अपारंपरिक” या विषयावर वेबिनारद्वारे सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठातील भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र आदी विभागातील विद्यार्थी तसेच अभियांत्रिकी व इतर महाविद्यालयातील असे एकूण 60 च्यावर विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेतला असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी. गायकवाड यांनी कळविले आहे.