महाराष्ट्र राज्य सिनियर आंतर-जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
ठाणे| शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये असलेल्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलची क्षमता वाढवून अतिरिक्त पाच बॅडमिंटन कोर्ट सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.तसेच याठिकाणी सुरू असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीमधील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाकडून उत्तम मार्गदर्शन मिळावं यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची देखील त्यांनी तयारी दर्शवली. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सिनियर अंतर-जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी ते आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
कोरोना कालखंडामुळे खंड पडलेल्या या स्पर्धेचे तब्बल तीन वर्षांनी ठाणे शहरात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 22 जिल्ह्यातील 350 हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तीन दिवस चाललेल्या ह्या स्पर्धेत अत्यंत चुरशीचे सामने रंगले. अखेर पुरुष गटात ग्रेटर मुंबई आणि ठाणे संघाने ब्रॉंझ, पुणे संघाने सिल्व्हर, तर नागपूर संघाने गोल्ड मेडल पटकावले, तर महिला विभागात ग्रेटर मुंबई आणि पुणे संघाने ब्रॉंझ, नागपूर संघाने सिल्व्हर तर ठाणे संघाने गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. या सर्व संघाना मेडल ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ बॅडमिंटनपटू श्री. रमेश चढा आणि मनोहर गोडसे यांचा मंत्री शिंदे यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तर श्रीकांत वाड यांनी ठाणे शहराला बॅडमिंटन खेळात वेगळी उंची प्राप्त करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचा देखील विशेष सन्मान केला.
ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 34 वर्ष सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमी कार्यरत असून या काळात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठाणेकर खेळाडूंनी नावलौकिक कमावला आहे. एवढंच नाही तर या अकादमीतुन आजवर 11 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू घडले आहेत.
हे जरी भूषणावह असले तरीही अकादमीच्या माध्यमातून ऑलिम्पिक विजेता ठाणेकर खेळाडू घडावा अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. त्यासाठी परदेशी प्रशिक्षकाची गरज लागल्यास त्यासाठी देखील विशेष निधी देऊन तरतूद करू असे त्यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक खेळाडू ठाण्यात येत असले तरीही त्यांच्या राहण्याची सोय होत नाही त्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून देण्याबाबत देखील विचार करू असेही त्यांनी अशवस्त केले.
तसेच राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोर्टस कमी पडत असल्याने याठिकाणी अजून पाच संपूर्णपणे वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट तयार करण्याची घोषणा केली. यासाठी नगरविकास विभागाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. या समारंभाला ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, उपायुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणे बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत वाड सर, माजी नगरसेवक गुरुमुख सिंग ग्यान आणि सर्व स्पर्धेक खेळाडू त्यांचे प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते.