शंकरराव चव्हाण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न -NNL


अर्धापूर, नीलकंठ मदने|
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर होते. 

या मेळाव्याचे उद्घाटक कार्यकारणी सदस्य, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडचे मा.पांडुरंग पावडे तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सौ.विद्याताई शेंदारकर  हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी महाविद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विविध योजना राबवण्यात आल्या विविध कार्यक्रम घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन विद्यार्थी घडवणे हे महत्त्वाचं कार्य महाविद्यालयीन काळात होते. विद्यार्थ्यांवर झालेले संस्कार हे पुढील आयुष्यात अतिशय महत्वाचे असतात असे प्रतीपादन केले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. के. के.  पाटील यांनी महाविद्यालय नॅकला सामोरे जात असल्याबद्दल व प्रगतीबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात २३ व २४ मे २०२२ ला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी माजी विद्यार्थ्याकडून महाविद्यालयास दिलेल्या प्रोजेक्टरचे व लॅपटॉपचे विमोचन झाले.  व्यासपीठावर  माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष एडवोकेट रावसाहेब देशमुख आणि सचिव गजानन भवानणकर, ग्रंथपाल प्रा.मधुकर बोरसे, माजी विद्यार्थी समन्वयक प्रा.डॉ. कोटलवार हे उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी अमोल डोंगरे, (सरपंच अम्बेगाव) चंन्द्रमुनी लोणे (माजी सरपंच लोण), कु. शुभांगी डखने यानी आपल्या मनोगतामध्ये तत्कालीन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.रावसाहेब शेंदारकर यांनी दिलेल्या संस्कारामुळे व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही विद्यार्थी यशस्वी झालो. आम्ही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहोत हे केवळ महाविद्यालयामुळे अशी भावना माजी  विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केले. 

यावेळी सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार  करण्यात आला. उद्घाटकीय भाषणात पांडुरंग पावडे म्हणाले की प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर सरांनी महाविद्यालय अतिशय कष्टाने उभे केले आणि अनेक विद्यार्थी घडवले याचा मला अतिशय आनंद होत आहे असे प्रतिपादन केले. भूगोल विभागाचे प्रमुख प्रा डॉ.राजेश्वर कोटलवार यांनी  डॉ रावसाहेब शेंदारकर सरांचे अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळे  अभ्यासक्रमाची ७५ पुस्तके भेट देऊन सत्कार केला. सदर  पुस्तके सरांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला दिली. यावेळी डॉ.हनुमंत भोपाळे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 

माजी विद्यार्थ्याच्यावतीने  प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर आणि प्रा. सौ. विद्याताई शेंदारकर  यांचे अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सौ. विद्याताई शेंदारकर  आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाचे माजी  विद्यार्थी विविध क्षेत्रात गुणवंत झाले याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजेश्वर कोटलवार यांनी केले तर आभार प्रा. डॉ.काझी मुख्तारोद्दिन यांनी केले. यावेळी प्रा.डाॅ. पठाण जे.सी., डॉ. विक्रम कुंटुरवार, डाॅ. ल.ना. वाघमारे, प्रा.डॉ. सारिका औरदकर, प्रा. डॉ. आर.बी. पाटील, प्रा. डॉ. रघुनाथ शेटे, प्रा.डॉ. के.ए. नजम, प्रा.सदाशिव भुयारे, डाॅ.के. के. कदम यांच्यासह माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी