संयोजन समितीच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे यांची निवड
नांदेड| बुध्द, फुले,शाहु, आंबेडकरी विचारांचे आजन्म प्रचारक तथा भीम गितांसाठी संपूर्ण जीवन झिजणारे,महान आंबेडकरी जलसाकार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, त्यांच्या अनन्य साधारण योगदानाला अधोरेखित करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन नांदेड शहरात करण्यात येणार आहे. संपूर्ण साहित्य संमेलन संयोजन समितीच्या अध्यक्षपदी येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
येथील सत्यशोधक फाउंडेशन आणि मानव विकास सेवाभावी संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या एक दिवसीय साहित्य संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद, साहित्य कृतींना पुरस्कार, साहित्यिकांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्कार, आंबेडकरी जलसा आदी भरगच्च कार्यक्रम असून यात महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शताब्दी वर्षानिमित्त वामनदादा यांच्या जीवनकार्यावर महाराष्ट्रातील १०० कविच्या कवितांचा कविता संग्रह, आणि माझ्या जीवनाचं गाणं या दादांच्या नव्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या संबंधीची एक बैठक ज्येष्ठ कार्यकर्ते एन.डी.गवळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मानव विकास संस्थेचे अध्यक्ष राज गोडबोले, कार्यवाहक कोंडदेव हाटकर, एन.टी.पंडीत, प्रभू ढवळे, डॉ. रामचंद्र वनंजे, रमेश कसबे, अशोक मल्हारे, ज्ञानोबा दुधमल, एम.एस.गव्हाने, महेंद्र नरवाडे, अनंत ढवळे, नितीन एंगडे, संजय जाधव, पी.के.खानापूरकर, एम.डी.जोंधळे,आर .पी.झगडे, मारोती कदम आदी मान्यवर उपस्थित होते.