नांदेड| मेंदुचे विकार असलेल्या रुग्णांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. अशा सर्वसामान्य रुग्णांना प्रतिवर्षी दोन वेळा शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राजस्थानी एज्युकेशन सोसायटी करीत असल्याचे प्रतिपादन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी केले आहे.
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रतिवर्षी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय मेंदुचे विकार, प्रथमच अस्थिव्यंग व हृदयविकार असणाऱ्या मुला-मुलींच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र तपासणी करण्यात आलेल्यांना नुकतेच आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात चष्म्याचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत बजाज बोलत होते. व्यासपीठावर अंकित अग्रवाल, मुख्याध्यापक नितिन निर्मल, आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. लक्ष्मीकांत बजाज म्हणाले की मस्तिष्क विकारामुळे दिव्यांगाना विविध आजाराचा सामना करावा लागतो. यासाठी मुंबई, हैद्राबाद आदी ठिकाणी जावून उपचार घेणे सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. अशा वाडीतांड्यावरील रुग्णांना लाभ व्हावा यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात उपचारासोबतच आवश्यक असलेल्या रुग्णांची मुंबई येथे मोफत शस्त्रक्रियाही करण्यात येते. या शिबिराच्या माध्यमातूनच अस्थि, नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. यातून अनेकांना लाभ झाला आहे. हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.
यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक नितिन निर्मल म्हणाले की, ज्यांना हालचाल करणे शक्य नव्हते ते आता चालू लागले आहेत. तर नेत्रशस्त्रक्रियेनंतर अनेकांना दृष्टी आली आहे. यातून अशा दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या एक तपापेक्षा अधिक काळापासून निरंतर हे शिबीर सुरु असून यापुढेही हे सुरु राहावे असा प्रयत्न आहे. या शिबिराचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचावा यासाठी संस्था व शाळेचे कर्मचारी परिश्रम घेत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नेत्र रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुरलीधर गोडबोले, तर उपस्थितांचे आभार उपमुख्याधापक गणेश धुळे यांनी मानले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर मनुरकर, इंदुमती पतंगे, मनीषा तिवारी, संजय रुमाले, आनंद शर्मा, किरण रामतिर्थे, संगीता नरवाडे, सुप्रिया कराड, गयाबाई सोनकांबळे, जिजाबाई खरंटमोल, शेख आरिफ, भीमराव दहिकांबळे आदींनी परिश्रम घेतले.