धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांचे आंबेडकरी समाजाला आवाहन
नांदेड| कोरोनाकाळामुळे गेल्या दोन वर्षांपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही. आता सर्व निर्बंध हटले आहेत. मोठ्या हर्षोल्हासात जयंती साजरी करण्यासाठी सर्व आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
परंतु प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करीत सर्वांनी जिल्हाभरात भीमजयंती उत्साहात आणि शांततेत साजरी करावी असे आवाहन येथील अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी बैठकीस जिल्हधिकारी डॉ. विपिन ईटनकर, महापौर जयश्री पावडे, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे, तहसिलदार किरण अंबेकर, नगरसेवक सुभाष रायभोळे, दुष्यंत सोनाळे, उन्मेष चव्हाण, पत्रकार मदने, भारतीय बौद्ध महासभेचे पी.एम. वाघमारे, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे प्रज्ञाधर ढवळे तसेच पोलीस विभागातील अधिकारी व सर्व धर्मियांचे शांतता समितीचे सदस्य व जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात होत असलेल्या श्रीराम नवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, महावीर जयंती, महाराष्ट्र दिन, समजान ईद, अक्षय तृतीया आणि बुध्द पौर्णिमा आदी जयंती, सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुढे बोलताना भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, कोरोना काळाने मानवी समुहांची कधीही भरुन निघणारी हानी केली आहे.
सर्वांना मृत्यू अटळ आहे. तेव्हा सर्व धर्मांचा आदर करुन प्रेम, करुणा, सामंजस्य, शांतता आदी मुल्यांचा अवलंब करून आपले जीवन जगावे. कोणत्याही सण, उत्सवात कसल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. यावेळी सर्व धर्मियांच्या वतीने आपापल्या प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. या संबंधाने येणाऱ्या समस्या अडचणी आणि त्यांची सोडवणूक यावर चर्चा झाली. कुणी जाणिवपूर्वक सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असेल तर अगोदर पोलिस प्रशासनास कळवा, प्रशासनाचे कान व डोळे तुम्हीच व्हा असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.