भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांचा सडेतोड सवाल
नांदेड| शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या महानगरपालिकेने आपले पाप झाकण्यासाठी आता करमणूक आणि मनोरंजनाच्या नावाखाली सांस्कृतिक कार्यक्रमावर लाखो रुपयांची उधळण करीत आहे त्यामुळे महानगरपालिकेकडून ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे नांदेड महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी केला आहे .
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चालली आहे अशी ओरड सत्ताधारी करीत असतात. मात्र यासाठी केवळ स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे. एकाच पक्षाच्या दावणीला महानगर पालिकेची सत्ता वारंवार बांधली गेल्याने महानगरपालिका म्हणजे येथील सत्ताधार्यांसाठी कुरण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आणायचा, विकासाच्या नावाखाली निवडणुकीवर तो खर्च करायचा आणि पुन्हा सत्ता मिळवायची असे कुटील राजकारण सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. पंचवीस वर्षांच्या काळात मनपाला शहरात शाश्वत विकास करता आला नाही.
गेल्या दोन महिन्यापूर्वी नांदेड शहरातील पथदिव्यांची वीजपुरवठा तब्बल पंधरा दिवस खंडित करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील स्ट्रीटलाइट पंधरा दिवस बंद होत्या. शहर अंधारात असताना काँग्रेसच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींना शहराला उजेडात आणण्यासाठी सुबुद्धी का सुचली नाही आता.आता मनपाच्या रौप्य महोत्सवाच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जो दहा दहा लाख रुपयांचा निधी दिला तो निधी त्यावेळेस महापालिकेच्या मदतीसाठी का दिला नाही ? असा संतप्त सवालही साले यांनी उपस्थित केला आहे. नांदेड शहरातील अनेक भागात आजही पिण्याचे पाणी, पक्के रस्ते , स्ट्रीटलाइट ,घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. महानगरपालिका प्रशासन केवळ भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहे.
येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचाराची सवय लावून मिळून-मिसळून महानगरपालिकेचा निधी लुटला जात आहे हे सर्व पाप झाकण्यासाठी आता महानगरपालिकेच्या रौप्यमहोत्सवारच्या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपये उधळण्याचा डाव आखला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम ही नांदेडकरांसाठी मेजवानी ठरणार असली तरी नांदेडकरांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली त्याचे काय ? असा सवालही प्रवीण साले यांनी उपस्थित केला. केवळ सत्ताधाऱ्यांचा निधी उधळणे, त्यातून गैरव्यवहार करणे आणि शहरातील नागरिकांना मामा बनविणे या पलीकडे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला शाश्वत विकासाची कोणतीही कामे करता आली नाहीत. महानगरपालिकेचा हा गैरव्यवहार आणि बनवाबनवी चा कार्यक्रम फार दिवस चालणार नसून आगामी निवडणुकांत नांदेडकर त्यांना निश्चितपणे त्यांची जागा दाखवतील असा विश्वास आहे प्रवीण साले यांनी व्यक्ती केला आहे.