नांदेड| मागील आठ महिन्यापासून चर्चेत असलेली वादग्रस्त बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर नांदेड ही शाळा पुन्हा चर्चेत आली असून त्या शाळेची तपासणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. नांदेड यांनी गटशिक्षणाधिकारी पं. स.नांदेड यांना लेखी स्वरूपात दिले आहेत.
उपरोक्त प्रजा बालक विद्यामंदिर शाळेवर आशा गायकवाड व केशव धोंगडे हे सन 1991 पासून सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांना तुमचे अप्रोल काढतो कुणाकडेही कुठेही वाच्यता करू नये असे संचालक मंडळातील सदस्यांनी धमकावले होते. परंतु निवृत्त होण्याची वेळ येऊनही अप्रोल काढण्यात आले नसल्याने व त्या शाळेवर इतर शिक्षकांची पदे भरमसाठ देणगी घेऊन भरण्यात आली असल्याने. नाईलाजास्तव आशा गायकवाड व केशव धोंगडे यांनी जिल्हा परिषदेसमोर दोन दिवस उपोषणही केले होते परंतु न्याय मिळत नसल्याने त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.20 डिसेंबर ते 10 जानेवारी 2022 असे वीस दिवस अखंड धरणे आंदोलन केले आहे.
अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्यामुळे त्यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांना देखील विनंती अर्ज केला होता. तेव्हा खा. हेमंत पाटील यांनी शिफारस पत्र देऊन अपरोल काढण्याची विनंती प्रशासनास केली होती. सिटू कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 29 मार्च दोन 2022 रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रजा बालक विद्यामंदिर या बोगस शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. नांदेड यांनी दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी पत्र काढून गटशिक्षण अधिकारी पं. स. नांदेड यांना उपरोक्त शाळा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्या पत्राची एक प्रत सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांना देखील देण्यात आली आहे. त्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रजा बालक विद्यामंदिर गांधीनगर नांदेड ही शाळा आरटीई 2009 बालकाच्या व सक्तीचा मोफत अधिनियम 2009 नुसार निकष पूर्ण करत नसल्याचे संघटनेच्या निवेदनात कळविले आहे.शाळेच्या चौकशीसाठी निवेदनातील मागण्या प्रमाणे कारवाई करण्यासाठी आपल्या स्तरावरून समिती गठित करून शासन निर्णय दिनांक 18/ 4/ 2013 नुसार कार्यवाही करून उलट टपाली चौकशी अहवाल विनाविलंब या कार्यालयास सादर करावा असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
एकंदरीतच मागील आठ महिन्यापासून संघर्षमय पाठपुरावा करणाऱ्या सहशिक्षिका आशा गायकवाड व केशव धोंगडे यांच्या प्रकरणाला न्याय मिळाला असून बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्या मंदिर गांधी नगर नांदेड या संस्थेवर कारवाई होण्याचे आता निश्चित झाले आहे. उपरोक्त बोगस शिक्षण संस्थेस विद्यार्थ्यांना खेळण्याचे ग्राऊंड नाही, शौचालय नाही, विद्यार्थी पटसंख्या खोटी दाखविण्यात आली आहे. शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासणी करावेत संचालकाच्या जावयाने गांधीनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या ओपन स्पेस मध्ये बंगला बांधला आहे. त्यावर योग्य कारवाई करावी. ह्या महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. सहशिक्षक पती पत्नी यांनी केलेल्या कामाचा मावेजा शासना तर्फे देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे. जोपर्यंत पीडित सहशिक्षक पती-पत्नीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करतच राहणार असे मत माकप सचिव कॉम्रेड गंगाधर गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.