मुळात राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठन करण्याचा जो घाट घातला तोच चुकीचा आहे. मातोश्री हे त्यांचे खाजगी निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानात जाऊन हनुमान चालिसाचा आग्रह धरणे हे कोणत्या कायद्यात बसते? समजा त्यांनी मातोश्रीच्या परिसरात जाऊन, एवढेच काय मातोश्रीच्या देवघरात जाऊन जरी हनुमान चालिसाचे पठन केले असते त्याने राज्याच्या परिस्थितीत काय सुधारणा झाली असती? राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या असत्या, बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या असत्या, राज्यातील वीज टंचाई दूर झाली असती, कोरोनाचा प्रादुर्भाव कायमचा दूर झाला असता, महागाई कमी झाली असती, पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्या असत्या? हनुमान चालिसा पठनाने असा राज्याच्या परिस्थितीत काय फरक पडला असता की, त्यासाठी राणा दाम्पत्याने त्यासाठी एेवढा आटापिटा करावा.
ईश्वराप्रती श्रद्धा असावी. त्यात काही गैर नाही. परंतु राज्यावरील संकट निवारणासाठी मातोश्रीच्या अंगणात हनुमान चालिसा वाचण्याचा जो राणा दाम्पत्याचा आग्रह आहे तो अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे हेही त्यांच्या लक्षात आलेले नाही. रवी राणा व नवनीत राणा दोघेही आमदार-खासदार आहे. या दोघांनीही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. त्यांचे ते कर्तव्यच आहे. परंतु केवळ राजकीय हेतुसाठी ते दोघेही आपले कर्तव्य विसरले. त्यांच्या या अनाठायी भूमिकेमुळे मुंबई, अमरावतीच्या पोलिस यंत्रणेवर निष्कारण ताण पडला. कारण नसताना पोलिसांना दोन दिवस राणा आणि उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी खडा पहारा द्यावा लागला. आमदार खासदार असणाऱ्या जबाबदार नेत्यांनी आपल्यामुळे पोलिस यंत्रणेवर किती भार पडतो याचेही भान ठेऊ नये हे आश्चर्यकारक आहे. या सगळ्यानंतरही मातोश्रीच्या अंगणात हनुमान चालिसा वाचल्यानंतर काय मिळाले असते याचे उत्तर मात्र शून्यच आहे.
दुसरीकडे राणा दाम्पत्याने मातोश्री समोर हनुमान चालिसा वाचण्याचे जाहीर केले की, शिवसेनेचे कार्यकर्ते अगदी विनायक राऊत, अनिल देसाई या खासदारासह अनेक माजी महापौरासह मातोश्रीच्या परिसरात जमा झाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे आहेत. राज्याचे सर्व प्रशासन त्यांच्याच हातात आहे. पोलिस यंत्रणाही त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना अडविण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे बळ आणि कायदाही आहे. मग शिवसेनेच्या समस्त नेत्यांनी मातोश्रीसमोर दिवसरात्र खडा पहारा देण्याची काय गरज होती. समजा एवढे करुनही राणा दाम्पत्य मातोश्री परिसरात आलेच तर महाराष्ट्रात कोणती त्सुनामी येणार होती? मुख्यमंत्री पद धोक्यात आले असते? त्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याचा जो संकल्प केला तो जेवढा चुकीचा होता तेवढाच मातोश्री समोर शिवसेनेचा जो जमाव जमला तोही चुकीचा होता. ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते अगदी वरुण सरदेसाईपासून सर्वजण ज्या पद्धतीने बोलत होते ते पहाता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, राज्यात शिवसेना सत्तेत प्रमुख आहे याचेही भान त्यांना राहिले नाही हेच दिसून आले.
वास्तविक राणा दाम्पत्याला अनुल्लेखाने टाळायला पाहिजे होते. त्याची दखलही घेण्याची गरज नव्हती. परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी मातोश्रीसमोर दिवसभर जो गोंधळ घातला त्याने राणांना न कळत मोठे केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी मातोश्री परिसरासमोर एकवेळ समजू शकते. कारण मातोश्री त्यांचे श्रद्धास्थान आहे. परंतु मग खार मधील राणांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिक का जमले? तेथे त्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न का केला? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळायला हवा. शेवटी राज्य त्यांचेच आहे. त्यांच्याच राज्यात त्यांनीच गोंधळ घालणे हे कितपत शोभादायक आहे याचेही भान त्यांना राहिले नाही.
सरकारने अजून एक मोठी चूक केली. सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणाऱ्या राणा दाम्पत्याला घरातच अडकवून पोलिसांनी योग्य कारवाई केली. त्यामुळे पुढचा संघर्ष टळला. त्यानंतर राणांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मग राणांना अटक कशासाठी करण्यात आली? अटक करुन सरकारने त्यांना अजून मोठे केले. दिवसभर शिवसेनेच्या मागे असणारी सहानुभूती अटकेमुळे राणांच्या बाजुने वळली. मविआ सरकारही पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग करते हा संदेश महाराष्ट्रात गेला. अटकेचे कारण काय त्यांनी भडकाऊ विधाने केली, गोंधळ निर्माण केला. मग याच कारणासाठी राणांच्या नावाने भडवा, हातपाय तोडू एवढेच बोलून न थांबता थेट राणांच्या घरासमोर अँम्बुलन्स उभी करणाऱ्या शिवसैनिकांची कृती राज्यात शांतता प्रस्थापित करण्याची होती का? मग राणांच्या घरासमोर गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांवरही कारवाई झाली पाहिजे.
राज्यात कायदा आहे हे दाखवून दिले पाहिजे. शिवसेनेशी खेटायचे असेल तर स्मशानात गोवऱ्या जमवून या असे संजय राऊत बोलतात हे विधान कोणत्या शांततेचे द्योतक आहे. राज्यकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांच्या समर्थकांनी आपल्या राज्यात अराजक निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, शांतता भंग होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असते. परंतु गेली काही दिवस शिवसेना-भाजप जो संघर्ष सुरु आहे त्यात दोन्ही कडून भान सुटल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातल्या शांतताप्रिय माणसाला हे चित्र अजिबात प्रिय नाही. परंतु त्याच्या हातात काहीही अधिकार नसल्याने तो शांतपणे हे सर्व पहात आहे.
जाता-जाता अजून एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. राणा दांम्पत्याच्या नौटंकीनंतर भाजपा नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली. अशा कारणावरुन जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भारतीय जनता पक्षांसाठी तो सर्वात मोठा आत्मघात ठरेल. आज जेवढे आमदार आहेत तेवढेही निवडून येणार नाहीत. सरकारला राज्यातील समस्याबाबत धारेवर धरुन अडचणीत आणण्याचे काम विरोधकांचे असते. ते त्यांनी जरुर करावे. परंतु केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करुन जर राज्यात राष्ट्रपती राजवट आणली तर राज्यातील सुजाण नागरिकांना ते कधीही पटणारे नसेल. त्याचा मोठा फटका भाजपला बसेल. आजच्या घडीला महाराष्ट्राचे सर्वात दुर्देव कोणते असेल तर सर्वांनाच विनाशकाले विपरित बुद्धी होत आहे. त्यामुळे राज्याचे नुकसानच अधिक होण्याची शक्यता आहे.
विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड