विजेचा लपंडाव आणि भारनियमन, सांगवी परिसरात अंधाराचे साम्राज्य -NNL


नांदेड|
सतत बिघाड आणि दुरुस्तीच्या नावाखाली विजेचा लपंडाव चालू असतो आणि त्यात भरीस भर म्हणून वेळी अवेळी होणारे भारनियमन यामुळे नांदेडच्या उशाला असलेल्या विमानतळ सांगवी परिसरात सतत अंधाराचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. यामुळे जनता हवालदिल झाली आहे.

नांदेड शहर व महानगर पालिकेत समाविष्ट असलेल्या सांगवी बु. कडे शासन प्रशासन, मनपा आणि वीज वितरण कंपनीचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. कसल्याच सोयी सुविधा या भागात पुरविल्या जात नाहित. येथील चारही नगरसेवक असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार पहावयास मिळत आहे.

रस्ते, ड्रेनेज, पाणी या नावाने नुसती बोंबाबोंब आहे. आता पावसाळा येऊ घातला आहे, त्यामुळे आणखी रस्त्यांची अवस्था दयनीय होणार आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही. वाढदिवसाच्या बॅनर बाजीमुळे या प्रभागात नगरसेवक नावाचे कुणीतरी आहेत याची जाणीव होते. बाकी सर्व अंधार पसरलेला असतो. नगर सेवक यांचे प्रत्यक्ष दर्शन फारच दुर्मिळ झालेले असते.

वीज वितरण कंपनीने देखील सांगवी प्रभगाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. येथील लाईनमन फक्त वसुलीत व्यस्त असतात. देखभाल व दुरुस्ती च्या नावाने नुसती बोंबाबोंब चालू आहे. सतत ब्रेकडाऊन आणि दुरुस्तीच्या नावाने विजेचा लपंडाव चालू असतो तर त्यात भर म्हणजे वेळी अवेळी होणारे जबरी भारनियमन. दिवसातून किमान दोन वेळा आठ तास इथे भारनियमन करण्यात येत आहे. 

भारनियमन पूर्णतः बंद करण्यात आल्याचे एकीकडे ऊर्जा मंत्री सांगत सुटले आहेत तर सांगवी परिसरात मात्र रात्री बेरात्री वेळी अवेळी कधीही भारनियमन करुन महावितरण कंपनीची मनमानी चालू आहे. नांदेड शहरात कुठेही भार नियमन नाही मग ग्रामीण भाग समजून सांगवी परिसरात भारनियमन का केले जात आहे ? हा परिसर महानगर पालिकेत समाविष्ट आहे, याकडे का दुर्लक्ष करण्यात येत आहे ? असा संतप्त सवाल जनता विचारीत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी