होट्टलचे ऐतिहासिक वैभव पुन्हा प्राप्त करून देवू - पालकमंत्री अशोक चव्हाण -NNL

होट्टल महोत्सवाला उत्साहात प्रारंभ; पर्यटन क्षेत्रात अपूर्व संधी


नांदेड|
नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव संपन्न वारसा मिळालेला आहे. उत्तर भारतातील नंदघराण्यानंतर मोर्य राजवंशाच्या सत्तेचा संबंध या भागाला आला. वेरुळचे कैलाश लेणे निर्माण करणाऱ्या राजवंशाचे सत्ताकेंद्र हे आपले कंधार होते. या काळात राजधानीचे नगर म्हणून कंधार विकसीत झाले. कंधारपासून होट्टल पर्यंतचा ऐतिहासिक वारसा खूप मोलाचा आहे. चालुक्याची उपराजधानी म्हणून होट्टलकडे पाहिल्या गेले. होट्टलनेही प्राचिन शिल्पस्थापत्य कलेचा एक समृद्ध वारसा आपल्याला दिला आहे. गत काळातील हे वैभव आपण होट्टलला पुन्हा प्राप्त करुन देवू, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

देगलूर तालुक्यातील होट्टल येथे “होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव”चे शानदार उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर, महापौर जयश्री पावडे, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे,पर्यटन उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, होट्टल येथील सरपंच हनिफाबी युसूफमिया शेख,जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामराव नाईक यांची विशेष उपस्थिती होती. 

नांदेड जिल्ह्याला पर्यटनाच्यादृष्टिने अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळे लाभलेली आहेत. आध्यात्माचाही याठिकाणी संगम आहे. माहूर येथील रेणुकादेवी,नांदेड येथीलतख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा, सहस्त्रकुंड येथील धबधबा, विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर, राहेर अशी पर्यटकांना वेगळी अनुभूती देणारी केंद्र, स्थळे नांदेड जिल्ह्यात आहेत. काळेश्वर येथे पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने भव्य वॉटर स्पोर्टचे केंद्र, सहस्त्रकुंड धबधबा परिसराचा विकास यावर आपण लक्ष केंद्रित केले असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळासंदर्भात एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले. होट्टल महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी होट्टल येथील ग्रामस्थांचा आवर्जून गौरव केला.

हजारो वर्षाचा ठेवा या गावातील लोकांनी जपून ठेवला आहे. सिद्धेश्वर मंदिर व रिदेश्वर मंदिर हे या जपून ठेवलेल्या शिल्पामुळेच आपल्याला उभे करणे शक्य झाले आहे. अजूनही दोन मंदिरांची शिल्पे गावकऱ्यांनी जपून ठेवली आहेत. होट्टल गावात विविध कामांमुळे जे उत्खन्न झाले त्यात सुमारे शंभर शिल्प निघाले. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी ते जपून ठेवली आहेत. जे योगदान होट्टल वासियांनी हा समृद्ध वारसा जपण्यासाठी दिले आहे ते अत्यंत लाख मोलाचे आहे, या शब्दात त्यांनी ग्रामस्थांचा गौरव केला. मराठवाड्यामध्ये औरंगाबादसमवेत इतर ठिकाणच्या पर्यटन स्थळांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगून राज्यातील पर्यटन विभागाचेपर्यटन मंत्री म्हणून अदित्य ठाकरे यांनी जे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत याचा आवर्जून उल्लेख करत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी आमदार जितेश अंतापूरकर यांनी हा महोत्सव आपल्या सर्वांचा बहुमान असलेला महोत्सव आहे, असे सांगून यापुढेही तो मोठ्या प्रमाणात साजरा करून असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचा आढावा घेतला. माजी सरपंच युसूफ मिय्याची शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी