मुंबई| “प्रभू श्रीरामचंद्र मर्यादापुरुषोत्तम आहेत. त्यांनी आदर्श जीवनाचा वस्तूपाठ घालून दिला. धैर्य, शौर्य, त्याग, स्नेह, संस्कार, पराक्रम, दृढ निश्चयासारखे गुण जीवनात कसे वापरावेत हे आचरणातून दाखवून दिलं. राजसत्तेचा त्याग केला.
मात्र, सत्याची लढाई निष्ठेनं लढली. दुष्प्रवृत्तींच्या विनाशासाठी सत्प्रवृत्तींना संघटित करण्याचं कौशल्य दाखवलं. शबरीची उष्टी बोरं प्रेमानं खाताना त्यांचं समतेचं, ममतेचं रुप दिसलं. सेतूनिर्मितीत खारीच्या वाट्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप मारण्याची कृतज्ञता त्यांच्या ठायी होती. राग, लोभ, मोह, मत्सर, अहंकाराला जीवनातून वर्ज्य करण्याची शिकवण दिली. प्रभू श्रीरामचंद्रांचं संपूर्ण जीवन, त्यांच्या जीवनावरील रामायणातील कथाप्रसंग अनंत काळासाठी मार्गदर्शन करणारे आहेत.
आज, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत उभं राहत असलेलं त्यांचं भव्य मंदिर प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्श जीवनाची, सद्गगुणांची ओळख जगाला करुन देईल. भारताची आध्यात्मिक, सांस्कृतिक एकता अखंडित ठेवण्याचं काम या माध्यमातून होईल,” असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामनवमीनिमित्त भगवान प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन केलं आहे. तसंच सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.