नांदेड, आनंदा बोकारे| थुगाव येथील गोदावरी नदी पात्रात एका मजुराचा रेती उपसा करत असतांना अपघात होऊन मृत्यू झाला त्या मजुराच्या मृत्यूस कारणीभूत रेती माफीया, संबंधीत तलाठी व मंडळ अधिकार्यावर गुन्हा दाखल करून मयत मजुरास न्याय देण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि.26 एप्रिल 2022 रोजी नांदेड तालुक्यातील थुगाव येथील गोदावरी नदी पात्रात रेती काढण्याचे काम करणार्या एका मजुराचा अचानक अपघाती मृत्यू झाला. ही वाच्छता कुठेही करू नये म्हणून संबंधीत रेती माफीयाने मयत मजुराच्या कुटूंबावर दबावाचा प्रयत्न केला आहे. या मजुराच्या कुटूंबाला न्याय मिळावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडने आवाज उठविला असून रेती माफीया, तलाठी आकाश कांबळे व मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करून त्यांना निलंबीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्हा हा रेती माफीयांसाठी कमालीचा ठरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अवैधपणे रेती उपसा व वाहतुक मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाच्या आर्शिवादाने होत आहे. दररोज रेती घाटावर व रेती वाहतुक करतांना अपघात होत असतात. प्रशासनाने यावर लगाम घातला असता तर आज एका मजुराचा मृत्यू झाला नसता, त्याचे कुटूंब रस्त्यावर आले नसते. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाळू माफीया आज कोणालाही घाबरण्यास तयार नाहीत, कारण त्यांच्यावर प्रशासनाचा आर्शिवाद असल्याचे दिसून येत आहे.
थुगाव येथील रेती मजुराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून तलाठी व मंडळ अधिकार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबीत करा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक नांदेड, तहसिलदार नांदेड यांच्यासह संबंधीतांना देण्यात आल्या आहेत.