नांदेड| लाल किल्ल्या नंतर देशातील सर्वात मोठे संमेलन म्हणून ख्याती मिळालेल्या नरेंद्र- देवेंद्र महोत्सवासाचे१४ व १५ मे २०२२ रोजी नवा मोंढा मैदान नांदेड येथे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी देशातील नामवंत कवी व हास्य कलाकारांना आमंत्रित करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
कोरोना संक्रमण काळामुळे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. शासकीय निर्बंध हटल्यामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी नरेंद्र- देवेंद्र महोत्सव घेण्याचा निर्णय करण्यात आला. यासाठी स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन उमरेकर यांनी स्वीकारली आहे.
दोन दिवस चालणा-या या काव्य मैफिलीत शनिवार दि.१४ मे रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहावा मराठी हास्य दरबार हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये बंडा जोशी पुणे, भालचंद्र कोळपकर अहमदनगर, अनिल दीक्षित सातारा, हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे परभणी, शाहीर रमेश गिरी नांदेड व चला हवा येऊ दे फेम सतीश कासेवाड नांदेड हे आपल्या अदाकारीने रसिकांना पोट दुखेपर्यंत हसविणार आहेत.नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि.१५ मे सायंकाळी पाच ते रात्री दहा यादरम्यान विसावे अ.भा. विराट कविसंमेलन होणार आहे.
यामध्ये हास्य गीतकार सुदीप भोला जबलपूर, वीर रसाचे प्रख्यात कवी मुकेश मोलवा इंदोर, हास्य व्यंगकार दिनेश देशी घी शाजापूर, संचलन राजेंद्र पंवार कोटा , हजरजबाबी शुंगार कवियत्री साबीया असर भोपाळ, हास्य कवी कपिल जैन यवतमाळ हे आपल्या प्रतिभेने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नांदेडकरांनी हे दोन दिवस राखून ठेवावे असे आवाहन डॉ. सचिन उमरेकर व ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.