महाज्ञानाच्या महामानवाला ... वंदितो सवे भिमाला ... अशा बहारदार गीतांनी "भीम पहाट" न्हाली -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी।
'महाज्ञानाच्या महामानवाला थोर त्यागी त्या बुद्ध गौतमाला वंदितो सवे भिमाला... ' या दरबारी कानडा रागातील  वंदन गीताने प्रज्ञाचक्षू गायक अनिल उमरे यांनी " भीम पहाट " या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाला प्रारंभ केला. तसेच शिवरंजनी रागातील 'शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे' हे गीत गाऊन सर्वांना तल्लीन केले.
         
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले-राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती व निर्मिक पुरुष बचत गट यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त "भीम पहाट " या शास्त्रीय संगीत   कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात करण्यात आले होते. जगातील सहा विद्वानांपैकी एक असलेले अतिशय व्यस्त जीवनचर्यातून व्हायोलीन शिकणारे आदर्श विद्यार्थी बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळच्या रम्य प्रहरी "भीम पहाट" कार्यकृमाद्वारे  सूर-तालाची मानवंदना देऊन जयंती साजरी करण्यात आली.
         
प्रज्ञाचक्षू युवागायक प्रदीप नरवाडे यांनी 'घटनेच्या पहिल्या पानावर गाजतय माझ्या भीमाचं नाव' व 'एकीने करा रे वार'  अविर्भाव तिरोभाव घेत गाईलेल्या जोषपूर्ण गितांनी प्रचंड बक्षीस मिळविले. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे सुरेश पाटील यांनी यमन रागातील 'चांदण्याची छाया कापराची काया' व भूपाळी रागातील 'पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली' ही वामनदादांची गिते तयारीनिशी सादर केली. संगीत विशारद गायिका आम्रपाली वाठोरे-कांबळे यांनी चारुकेशी व पहाडी या दोन रागातील 'ज्ञानपिपासू युगंधराच्या आठवणींना स्मरू, साजरी भीम जयंती करू ' व सुरेश पाटील यांच्या साथीने 'भीमरावांनी देशासाठी प्रेम अलौकिक केले' हे युगल गीत गाऊन टाळ्या मिळविल्या.
     
कवी गायक रुपेश मुनेश्वर यांनी 'आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण' हे पहाडी रागातील गीत गाऊन स्मृतिशेष मनोहरदीप रुसवा यांची आठवण करून दिली व  स्वरचित 'माझ्या भीमरायाचं देणं भारताचं संविधान ' हे गीत सादर केले. या अनोख्या कार्यक्रमाचे संयोजक, संकल्पक उत्तम कानिंदे यांनी निवेदन केले. बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष  अभियंता प्रशांत ठमके व जयंती उत्सव समिती अध्यक्ष विनोद भरणे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती.
       
सुरेश पवार (मुंबई) यांनी तबला,  भीमराव पवार (मुंबई) व साहेबराव वाढवे यांनी ढोलकी, राहुल उमरे यांनी ढोल, राहुल तामगाडगे यांनी अक्टोपॅड, अनिल उमरे व प्रदीप नरवाडे यांनी सिंथेसायझर साथ संगत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्मिक पुरुष बचत गटाचे संदीप पाटील, रमेश मुनेश्वर, सोमा पाटील, विष्णू मुनेश्वर, आनंद गिमेकर, सुमेध भवरे, भारतध्वज सर्पे आदींसह संतोष पाटील , प्रा. विशाल गिमेकर , निवेदक कानिंदे यांनी परिश्रम घेतले. बहारदार गीतांनी "भीम पहाट" न्हाली .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी