‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ पुस्तकाचे प्रकाशन; कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान -NNL


मुंबई|
कबड्डी खेळात राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी  करणाऱ्या खेळांडूचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित करणाऱ्या ‘कबड्डीचे 100 महायोद्धे’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान सोहळा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बीकेसी येथील एम.सी.ए.  क्लब येथे  हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, हूतुतू ते कबड्डी हा प्रवास प्रत्यक्ष मातीत खेळून राज्याच्या या लोकप्रिय खेळाचा इतिहास गाजविणारे पुस्तक व कबड्डीचा प्रत्येक योद्धा घडविणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा आहे. कबड्डी महर्षी शंकरराव बुवा साळवी यांच्या सारखे मार्गदर्शक व प्रशिक्षकांनी या खेळास मोठ्या उंचीवर नेण्यास मोलाची कामगिरी  बजावली आहे. अर्जुन पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशा 99 पुरुष व महिला खेळाडू ज्या एका व्यक्तीने भक्कम आधार देऊन घडविले, त्यांचा हा सन्मान आहे. खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशने इनडोअर अकादमीची स्थापन केली, अशा अकादमी सर्व भारतीय खेळांसाठी निर्माण करता येऊ शकतात. राज्य शासन त्या धर्तीवर आघाडीचे कार्य करीत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठाची उभारणी एक उत्तम उदाहरण आहे. कबड्डी महायोद्धा पुरस्कार विजेत्यांनी उत्तम खेळाडू घडविण्यासाठी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार अभिनंदनपर संदेशातून म्हणाले की, मातीतील खेळाचा गौरवशाली इतिहास मांडणारे हे पुस्तक भविष्यात नवे खेळाडू घडविण्याचे कार्य करेल. कबड्डी या खेळाला सातासमुद्रापार नेण्यात पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे,  असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले की, जागतिक दर्जाचे खेळाडू हेच राज्याला व देशाला सर्वच क्षेत्रात निरोगी, सुदृढ  मनुष्यबळ  उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणी हे मनुष्यबळ निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्कीच योगदान देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनात राज्य क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती करेल, असे सांगून पुरस्कार विजेते व आयोजकांचे  क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आभार व्यक्त केले.

खासदार सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या पन्नास वर्षात या खेळासाठी व खेळ सातासमुद्रापार नेण्यात मोलाची कामगिरी  पुरस्कार विजेत्या खेळाडूंची आहे. त्याचप्रमाणे खासदार श्री पवार यांनीही सर्व स्तरांवर सकारात्मक भूमिका आजपर्यंत घेतली असल्याचे श्री. तटकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर, मुंबई कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष भाई जगताप, प्रशिक्षक शंकरराव साळवी , अर्जुन पुरस्कार व शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी