नांदेड| सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, समाजसेवक गणपतराव कदम गुरुजी (वय 82 वर्ष) यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी वैदीक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
गणपतराव कदम उर्फ कदम गुरुजी हे मुळचे किनवट तालुक्यातील भिसी या गावचे रहिवाशी आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बरबडा येथील शाळेत त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून कार्य केले. पुढे नांदेड येथील शारदा भवन शिक्षण संस्थेच्या शारदा भवन हायस्कूल, महात्मा फुले हायस्कूल येथे सेवानिवृत्ती पर्यंत त्यांनी विद्यादानाचे कार्य केले.
कदम गुरुजी यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ याची स्थापना केली आणि या द्वारा शिक्षित, अर्धशिक्षित आणि अशिक्षित स्त्री- पुरुषांना पंचीकरण, पाणिनीय संस्कृत व्याकरण, योगदर्शन, ज्ञानेश्वरी शिवसंहिता आदि आध्यात्मिक ग्रंथाचे अध्यापन केले. त्यांचे हजारो शिष्य देशात आणि विदेशात कार्यरत आहेत. शहर विकास समिती तसेच जिल्ह्यातील विविध विकास आंदोलनात त्यांनी दिवंगत कॉ. अनंतराव नागापूरकर, माजी खा. व्यंकटेश काब्दे, डॉ.पी.डी. जोशी पाटोदेकर यांच्यासोबत सक्रीय सहभाग नोंदविला.