पालकमंत्र्यांचे जंगी स्वागत; काँग्रेस कार्यकर्त्यांत संचारला उत्साह
कंधार, सचिन मोरे| मराठवाडा व नांदेड जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देतानाच कंधार व लोहा तालुक्याला निधीची कमतरता कधीच पडू दिली नाही. या वर्षी या दोन्ही तालुक्यात तब्बल 70 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. भविष्यातही निधीची कमतरता भासू देणार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही दबावाला घाबरु नये मी तुमच्या सोबत आहे. अशी निःसंदिग्ध ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे दिली.
विविध कार्यक्रमांसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण कंधार-लोहा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. भव्य मोटारसायकल रॅलीची सांगता बचत भवनमध्ये कार्यकर्ता मेळाव्यांनी झाली. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, शहराध्यक्ष हमीद सुलेमान, जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथ मोरे, माजी सभापती लक्ष्मीबाई घोरबांड, तालुका उपाध्यक्ष नागोराव पाटील मोरे, नगरसेवक मन्नान चौधरी, शहाजी नळगे,सुधाकर कांबळे, स्वप्नी लुंगारे, सतिश देवकते, व्यंकटराव कल्याणकर आदींची उपस्थिती होती.
ना.चव्हाण पुढे म्हणाले की, कंधार तालुक्यातील रस्ते विकासावर माझे विशेष लक्ष आहे. माणुसपुरी ते बहाद्दरपुरामधील राष्ट्रीय महामार्गाचे वळण रस्त्यामुळे काम रखडले आहे. तसेच भोपाळवाडी ते धावरी फाटा हे सुध्दा काम झाले नाही. या संदर्भात लवकरच बैठक लावून निधीची तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. तालुक्यामध्ये काँग्रेसची ताकद आहे. पदाधिकाऱ्यांनी एकजूट दाखवून विरोधकांची दोन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. कोणालाही घाबरु नका मी तुमच्या सोबत आहे. असे सांगतानाच तुम्ही दोन पाऊल पुढे चला मीही दोन पाऊल पुढे येईल असेही ते म्हणाले.
यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश देवकते यांनी केले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. यामध्ये माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, स्वप्नील लुंगारे यांच्या घरी सदिच्छा भेटी दिल्या. तर माजी नगराध्यक्ष रामराव पवार यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे सांत्वन केले.