नांदेड। नांदेड जिल्ह्यात अवैध हत्यार वापरून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या संबंधाने गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना शिवाजीनगर पोलीससानी एका ऍटोमध्ये वाहतुक होत असलेल्या 25 तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये अवैद्य शस्त्र आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चालू महिन्यात दि 5 रोजी प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. या हत्याकांडानंतर नांदेड जिल्ह्यात आणि शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुध्द मोहीम पोलीस अधीक्षक प्रमोदकूमार शेवाळे यांनी दिलेल्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. त्याच पर्शवभूमीवर शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकास गोकुळनगर भागात पाठवले.
यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने गस्त केली असता ऑटो क्रमांक एम.एच.26 एन.5254 चा पाठलाग करून शिवाजी नगर येथे थांबविले असता तपासणी केली. यावेळी एका पुष्टयाच्या बॉक्समध्ये 25 तलवारी आढळून आल्या. गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक सोनकांबळे, पोलीस अंमलदार रामकिशन मोरे, शेख इब्राहिम, दिलीप राठोड, देवसिंग सिंगल आदींनी पकडलेल्या तलवारीची किंमत 60 हजार रुपये आहे.
त्यावरून आकाश शिवाजी गोरकवाड (19) रा.आमदुरा ता.मुदखेड यास ताब्यात घेतले. या 25 तलवारी हरप्रितसिंघ जसपालसिंघ वसीर (41) यांच्या मालकीच्या आहेत असे आकाश गोरकवाडने सांगितले. त्यानुसार गुन्हा क्रमांक 164/2022 भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल करण्यात आला आहे. अत्यंत मोठ्या संख्येत तलवारी पकडणाऱ्या शिवाजीनगर पोलीसांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले आहे.