नांदेड,अनिल मादसवार| नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने सन 2021-22 मध्ये महसूल वसुली व अंमलबजावणी कामकाजात महसूल वसुलीच्या 106 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या विभागात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. महसूल वसुली कामात उद्दिष्ट 177 कोटी रुपये एवढे होते यात 188 कोटी रुपयाची पूर्तता करून 106 टक्के कामाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. तर अंमलबजावणी कामकाजात 738 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले होते यात 696 लाख रुपयाची उद्दीष्ट पूर्तता करून 94 टक्के हे काम पूर्ण केले आहे.
नांदेड विभागाने एकुण 188 कोटी रुपयाची महसूल वसुली केली आहे. वाहन अंमलबजावणी (वाहन तपासणी) कामात 13 हजार 420 दोषी वाहनधारकांकडून 696 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकाद्वारे नांदेड कार्यालयाने 2 हजार 184 वाहनांकडून 168 लाख रुपये इतका महसूल प्राप्त केला आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रादेशिक विभागाने मागील तीनही आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली असून शासनाने दिलेल्या महसूल वसुलीचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी, हिंगोली कार्यालानेही त्यांचे काम चांगले पार पाडले आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात सुद्धा या विभागाकडून महसूल वसुलीसाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शिकाऊ, पक्के अनुज्ञप्तीसाठी मासिक शिबिराचे आयोजन
प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी एप्रिल 2022 महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधिन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट 5 एप्रिल 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येणार आहे. अपॉइटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याबाबची नोंद घेऊन शिबिर कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
तालुक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे शिबिराचे आयोजन केले आहे. नांदेड तालुक्यासाठी 9 ते 23 एप्रिल 2022, मुखेड तालुक्यासाठी 7 एप्रिल, किनवट तालुक्यासाठी 13 एप्रिल, हदगाव तालुक्यासाठी 20 एप्रिल, धर्माबाद तालुक्यासाठी 22 एप्रिल, हिमायतनगर तालुक्यासाठी 26 एप्रिल तर माहूर तालुक्यासाठी 29 एप्रिल 2022 रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ
केंद्र शासनाने 4 ऑक्टोंबर 2021 च्या अधिसूचनेद्वारे केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 व नियम 81 मध्ये सुधारणा करुन विविध शुल्कात वाढ केली आहे. या सुधारणेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. ही अधिसूचना केंद्र सरकारच्या morth.gov.in या संकेतस्थळावर व तसेच कार्यालयीन सुचना फलकावर उपलब्ध आहे. या अधिसूचनेप्रमाणे वाहन 4.0 प्रणालीमध्ये परराज्यातील वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व पूर्ननोंदणीच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
