महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई| “सावित्री घरोघरी आणि ज्योतिबाचा शोध जारी” ही वस्तुस्थिती एकंदर संपूर्ण जगभरातच दिसून येत आहे. त्यामुळे देश असो की विदेश महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी प्रत्येक घरात सावित्रीसह एका ज्योतिबाची तितकीच गरज असल्याचे परखड मत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडले. आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने आयोजित ‘ब्रेक द बायस’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ॲड. ठाकूर बोलत होत्या.
हाऊस ऑफ कॉमन्स, नॅशनल इंडियन स्टुडंटस अँड अल्युम्नी युनियन, युनायटेड किंगडम आणि बार अँड बेंच यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्ताने आयोजित ‘ब्रेक द बायस’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आज पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, भारताच्या अतिरिक्त अधिवक्ता ऐश्वर्या भाटी, आंतरराष्ट्रीय वकील करुणा नंदी, सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील गीता लुथरा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील तन्वी दुबे आणि नॅशनल इंडियन स्टुडंटस अँड अल्युम्नी युनियन, युनायटेड किंगडमच्या संस्थापिका सनम अरोरा आदि मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान महिला धोरणकर्त्यांची भूमिका या विषयावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री म्हणून महिला धोरणकर्त्यांच्या भूमिकेतून ॲड. ठाकूर यांनी बोलत असताना अनेक मुद्दांवर आपली मते मांडली. यावेळी त्या म्हणाल्या देश किवा विदेशात एक स्त्री म्हणून प्रत्येकीला नेहमीच संघर्ष करावा लागला आणि आजही लागतो. सर्वच स्तरावर अडचणी या वेगवेगळ्या आहेत. आज अर्थंसंकल्पात जेंडर बजेटवर सातत्याने भर देण्यात येतो, मात्र महिलांना त्यातून खरा न्याय देण्याचं काम महिला धोरणाच्या माध्यमातून होतं, महिला धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात असून महिलांसोबत LGBTQIA+ समुदायाचा सहभाग यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच धोरणाची अंमलबजावणी फार महत्वाची आहे. त्यामुळे एकंदर सर्वच पातळीवर या धोरणाचा विचार करण्यात आला आहे, असे त्या म्हणाल्या.
महिला तसंच LGBTQIA+ साठी असलेलं हे धोरण म्हणजे पुरुषांचा विरोध असं याचं चित्र नाही. पूर्वी स्त्री-पुरुष एकाच रथाची दोन चाकं मानली जातात. ही गाडी सुरळीत चालावी म्हणून पुरुषांचा या प्रक्रियेतील सहभाग ही महत्त्वाचा आहे. कारण अजूनही स्त्री पुरुष समानता केवळ कागदावरच आहे. त्यामुळे या महिला धोरणात पुरुष जनजागृतीसाठी विशेष बाब म्हणून एक परिशिष्ट असावं असा माझा मानस आहे. सावित्री घरोघरी आणि ज्योतिबांचा शोध जारी अशी स्थिती निर्माण होता कामा नये म्हणून ही महिला धोरणात प्रयत्न करणार आहे असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या. यावेळी सहभागी व्यक्तिंनी महिला धोरणावर आपल्या सूचना काळविण्याची विनंतीही त्यांनी केली.
नॅशनल इंडियन स्टुडंटस अँड अल्युम्नी युनियन ही संस्था ब्रिटनमधील युवा भारतीयांच्या जनसमुहाचे प्रतिनिधित्व करते. या संस्थेच्या माध्यमातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.