महिला दिन -NNL


पुर्वीच्या काळी शाळेत अवघड काम वाटायचे ते म्हणजे ... जयंत्या, पुण्यतिथ्या यांच्या तारखा पाठ करुन ठेवणे ... अमुक या तारखेला हे .... तोंडपाठ केले तर आपल्या हुशारीला परिक्षेत दोन मार्काची किंमत मिळत गेली.त्यामुळे परिक्षा संपल्यावर सर्व मित्रा सोबत प्रश्नपत्रीका पाहण्यांत मज्जा होती.एकमेकांत कुणी किती प्रश्न सोडवले त्याची चाचपणी होत गेली.यात कुणी जयंतीची तारीख वैगरे चुकली किंवा या नेत्याची त्या नेत्याच्या  तारीखे मध्ये घोळ घातला की ... शाळेत ते  पोरंग मेल्याहुन मेल होई.या मुळे पोराला ते दिवस अन पेपर कायम लक्षात बसत गेला.अस्या वेळी त्याचे मित्र शाळेसमोरच्या उभ्या असलेल्या लालाच्या गाड्यावर काही तरी खावु घालीत ... दोस्तच शेवटी .. यावेळी कामाला नाही तर नंतर कधी येतील ? आताच्या काळात तारखांचा घोळ घातला तर भांडणेच होतील.

तर असे हे शाळेच, काँलेज मधील हे आयुष्य आई - वडीलांच्या जीवावर केव्हा स्वप्नासारखे अलगद भुरकून उडून गेले तेही समजत नाही.त्या नंतर मग सुरु होतो तो पुढील आयुष्याचा खेळ... खरा जीवन प्रवास ... या प्रवासात कायम सोबतीला... आज पर्यत कधी न पाहीलेल्या, ओळख नसलेल्या ,न बोलल्या स्त्री सोबत लग्न होवुन...  कायम जीवनसाथी बनवुन ...सुरुवात होते ते जीवनाच्या एका नव्या प्रवासाची ...हे नविन नविन छान चालते ... बरे ही वाटते पण नवीन असे पर्यत ... नंतर हळुहळू सर्व काही अंगवळणी पडते. तेच तेच कामे ... तेच ते आँफीस ... आणी यातुन येणा-या अडी -अडचणी, प्रश्न सोडवत जगत बसत असते माणुसं.... दुसरे काय होणार ?  यातुन माणसांच्या आरोग्याची बिघाड होत डोळ्यावर चष्म्याची काडी केव्हा येवुन बसते ते ही कळत नाही.काळ्याचे पांढरे केस हळूहळू होवु लागतात ते ही समजत नाही.

आज ही रोजच्या सारखाच विक्रम सकाळी उठून आँफीसला जाण्याची तयारी करु लागला.इकडे किचन मध्ये नुसत्या फोंडणीच्या नेहमीच्या वासात  सविताची डबा करण्यात... चहा देण्याची घाई चालु होती. नव-याच्या आधी भल्या पहाटे किचन मध्ये ती बिचारी शिरलेली होती.पोटच लहान बाळ झोपत ठेवुन... यात जरा ही काही कमी जास्त झाले की ... नव-याला उशीर ... उशीर होत असला म्हणजे नव-या कडुन ऐकावे लागणारे टोंमणे ... थोड्या फार कधी शिव्याचा नाष्टा ही सविताचा होत असे.तरी बरं अलिकडे राजा-राणी संसारात जास्त इतर मंडळी नाहीत.सासु -सासरे सोबत राहत नाहीत.सरकारनेच छोटा परिवार, सुखी परिवार म्हटले.त्यामुळे लोक ही हुशार ... आपलं नवरा-बायको अन एक नाही तर दोन लेकरं येवढाच परिवार ठेवत आहेत.बाकी माथारे -कोथारे गावाकडे वैगरे पार सांधीत पडलेले असतात. असाच छोटा परिवार या विक्रमचाही होता.

विक्रम स्नान वैगरे आटपुन रोजच्या सवयी नुसार आलेला पेपर वाचत होता.तेवढ्यात लेकरु रडत उठल्याचा आवाज आला.विक्रमने वाचायलेला पेपर थोडा बाजुला करुन किचन मध्ये आवाज जाईल असा मखपणे म्हणला 

' अंग .. ऐकतेस का ?  ते बघ बाळ उठले वाटते ... ' अस म्हणुन पुन्हा पेपर मध्ये तो डोक  घालतो. इकड बाळ मध्येच झोपेतुन उठल्यामुळे चेह-यावर वैताग आला तरी बाळासाठी आतुन ममता दाटुन आलेली सविता हातातले सर्व कामे सोडुन बाळा कडे जाते.

अलीकडे कँलेन्डर वर आज काय आहे ?  हे स्मार्ट फोन आला तस पाहण्याची गरज उरली नाही.विक्रमने सर्व आँफीसची जाण्याची तयारी करुन  थोडा फार उरलेला वेळ आपल्या व्हाँट्स अँपला देवु लागला.तिथे असंख्य येत असलेले मेसेज पाहुन विक्रमच्या लक्षात आले की आज काय विशेष आहे ते .. आज महीला दिन होता. नको नको म्हणत असलेले लोकही कित्येक शुभेच्छा, संदेश पाठवित होते. याला काही पैसे नाही, काही नाही. इकडला मेसेज धरला की तिकडे नेवून टाकायचा सोप्पा कार्यक्रम होता. म्हणुन जरा जास्तच कुठल्याही दिनी प्रेम ऊतु येत असते. कुणाच्या वाढदिवसाला तर फारच प्रेम ... ते व्यक्ती समोर कधी आला तर त्याला बोलणार ही नाहीत पण इकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्कीच देणार. तसे आज ही महीला दिनाचे प्रेम भडभडून वाहत असलेले मोबाईल वर विक्रमला दिसल्या मुळेच आज महीला जागतिक दिन असल्याचे कळाले. सहज विक्रमने आपल्या  बायको... सविता कडे चष्माच्या वरच्या भागातुन नजर टाकली.

सविताची आपली लगभग ...  रोजच्या वेळेत चहा, नाष्टा,देवुन हातात डबा ही तयार करुन देण्याची ... एका हातात बाळाला कडेवर घेवुन हे सर्व कामे करत होती.उठले तसे तिने अजुन कप भर चहा पिला नसेल हे विक्रमला नेहमीच माहीत होते.आज जरा त्या खिडकी जवळ अंधुक प्रकाशात बसलेली सविता .. का कुणास ठावुक जास्तच थकल्या सारखी दिसत होती.ते बाळाच्या डिलीव्हरी पासुन सविताला सुख म्हणजे नव्हतेच.जन्मलेले मुल अपंग पदरात पडले तेव्हा पासून तर सविता फार बदलून गेली.

खुप मोठे बदल झाले म्हणण्या पेक्षा बदल करुन घ्यावे लागले.रोज सविताला घरातले करुन या अपंग मुलाची मोठी जवाबदारीतून समोर जावे लागत असे.कसे ही बाळ असले तरी शेवटी काळजाचा तुकडा ... त्याला थोडे ही काही झाले .. रडू लागला तरी सर्व परिवाराला वेदना होत असत.त्या ही पेक्षा बाळाची आई म्हणून सविता तर रात्र भर जागून बाळाचा सांभाळ करत असे. अशा बाळाचे अपंगत्व जेव्हा लक्षात आले तेव्हा तर सर्व काही गमावले सारखे वाटू लागले.तरी कधी काही म्हणत नसे. थोड फार म्हणत गेली अन पुन्हा कामात विसरुन जात गेली.तब्येत ही थोडी बारीकच झाली होती.हे सर्व बारीक नजरेन न्हाळरत असलेला नव-याची सविताला थोडीच चाहुल लागणार नाही.तिला ती जाणीव झाली तेव्हा लगेच ती जवळ येत म्हणली 

 'का हो .. काय झाले ?  किती वेळेचे झाले पाहता मला ... आँफीसला उशीर होत नाही का ?  ' 

'नाही गं.. काही झाल नाही. आज तु जरा जास्त थकल्या सारखी दिसतेस. का ?  काय झाले ?  '

' काही नाही हो ...येवढे काही नाही ... ते सिजरचे पोटाला टाके दुखायलेत.. बाकी काही नाही.  ' 

सविता हळुच बाळाच्या डोक्यावर हात फिरवत बोलुन गेली.तसे इकडे विक्रमला थोडी काळजी वाटली. त्यांने सविताचा हात जवळ ओढत, सविताचे घामाने फिझलेल्या पाठीवर अलगद हात फिरवत म्हणाला  'सविता ... जावु दे .. मी जात नाही आँफीसला ... बाँसला नेहमीच काही तरी कारण सांगुन दांडी मारतो. ' सविता लाडातल्या रागाने म्हणली ' .. आणी तेवढ्या सकाळी उठुन मी स्वंयपाक केला. त्याचे काय ?  ' ' काही नाही ... मी घरी असलो तर जेवणार नाही का ? ' 

विक्रमने बाळाला अन त्याच्या आईला जवळ ओढत सविताच्या कानात गोड हसत म्हणला 

' चला  आज... आँफिसला दांडी मारुन .. जागतिक महीला दिन साजरा करु या ... ' 

लेखक - विजय चव्हाण , नांदेड, 9422349940

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी