गव्हाचे ७ पोते आखाड्यावरून गेले चोरीला
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र थांबले असताना पुन्हा चोरट्यानी शेतीच्या कठड्यावर चोरीच्या प्रकाराला सुरुवात केली आहे. दि.२२ च्या रात्रीला अज्ञात चोरट्याने एका गरीब शेतकऱयांच्या शेतातील काढून शेजारच्या एखाद्यावर ठेवलेल्या गव्हाचे पोते लांबवीले आहे. याबाबत शेतकऱ्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.
दि.२२ मार्च रोजी हिमायतनगर येथील रहिवाशी असलेले शेतकरी देविदास ढोणे यांच्या शेत सर्वे नंबर ११४ हिमायतनगर शिवारात बोरगाडी रोडवर आहे. त्यांनी त्यांच्या शेतीतील १/२ एकर मधील रानात पेरलेला गहू हार्वेस्टर मशीनच्या साहाय्याने मंगळवारी काढला. दरम्यान नातेवाईकांचा देहावसान झाल्याचे समजल्यामुळे त्यांनी काढणी केलेला गहू घरी नेने योग्य नसल्यानं शेजारील शेतकरी श्री रामचंद चवरे यांच्या शेतातील एखाद्यावर उत्पादनातून हाती आलेले गव्हाचे ७ पोते अंदाजे ३ क्विंटल ५० किलो गहू ठेवला होता. त्यानंतर ते घराकडे गेले दरम्यान रात्रीला १०.३० वाजेच्या सुमारास शेजारील शेतातील आखाड्याच्या दरवाजाचे काडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून गव्हाचे ७ पोते चोरून नेले आहेत.
सदर गव्हाची किंमत अंदाजे ६ हजार ५०० रुपये असून, सकाळी शेजारी शेतकऱ्याचे सालगडी श्रीराम यांनी सांगितल्यानंतर शेतीमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी एखाद्यावर ठेवलेल्या गव्हाचे ७ पोते चोरी झाल्याचे समजले. याची माहिती त्यांनी पोलिसाना दिली तातडीने पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणची आणि परिसर पिंजून काढला मात्र कुठेही पोते आढळले नाही. त्यानंतर देविदास श्यामराव ढोणे यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात अर्ज देऊन गव्हाचे पोते चोरीला गेल्याची तक्रार दिली. गहू चोरून नेणाऱ्या चोरट्याचा तपास लावून मला न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली जमादार अशोक सिंगणवाड व त्यांचे सहकारी करत आहेत.