नांदेड| गेल्या पंधरवाड्यापासून शहरातील तानाजीनगर भागात रात्री-बेरात्री तासनतास वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. वीज महामंडळाच्या लहरी कारभाराचा फटका मात्र भर उन्हाळ्यात नागरिकांना वीज बील भरुनही सहन करावा लागत आहे.
तानाजीनगर भागात काही भागात सुरळीत वीज पुरवठा होतो तर काही भागात कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने अनेकांच्या घरातील वीजेवर चालणारी उपकरणे निकामी होत आहेत. आधीच उन्हाळ्याचा उकाडा त्यात मच्छरांचा वाढता उपदव्याप त्याच्या जोडीला वीज महामंडळाचा हा लहरी कारभार. त्यामुळे या भागातील नागरिक तिहेरी संकटात सापडले आहेत.
रात्रीच्या वेळी अशी अचानक तासनतास वीज पुरवठा बंद होत असल्याने नागरिकांना मच्छरांसोबतच रात्र जागून काढावी लागत आहे. हा प्रकार एक-दोन दिवसापुरता नाही गेल्या पंधरवाड्यापासून सतत सुरु आहे. अनेकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. यावर कहर म्हणजे संबंधीत कर्मचार्याशी संपर्क केला असता अनेकदा महाशयांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश मिळतो. अशा स्थितीत नागरिकांनी कैफियत मांडावी तरी कुणाकडे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. तरी तात्काळ या भागातील वीज पुरवठा सुरळीत करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.