नांदेड| चर्मकार समाजातील सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकांचा विकास व्हावा या सद्हेतूने शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाची निर्मिती केली. परंतु या नावातून चर्मकार समाजाच्या व्यवसाय व जातीचा बोध असल्यामुळे सदर नावात सुधारणा करुन त्याऐवजी श्री संत रोहिदास महाराज आर्थिक विकास महामंडळ असे करण्यात यावे अशी मागणी श्री संत रोहिदास महाराज तिर्थक्षेत्र नांदेडचे संस्थापक सचिव वामनराव विष्णुपूरीकर यांनी एका निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, तळागाळातील व सामान्य लाभधारकांना योजनांचा लाभ व्हावा व त्याचप्रमाणे दुर्बल घटकांना सक्षम करण्याच्या हेतूने शासनाकडून अनेक आर्थिक विकास महामंडळांची निर्मिती करण्यात येत असताना त्या- त्या महामंडळाच्या शिर्षकस्थानी महापुरुषांची नावे देण्यात आलेली आहेत. पण त्या शिर्षकाच्या पुढे कुठेच व्यवसायाचा वा जातीचा उल्लेख केलेला नाही, त्याबद्दल अभिनंदन. परंतु अनुसूचित जातीतील चर्मकार (चांभार, ढोर, मोची, होलार आदी) समाजाच्या लाभधारकांसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाची निर्मिती करण्यात आली. त्यात चर्मोद्योग व चर्मकार या व्यवसाय- जात सूचक- वाचक शब्दाचा जाणीवपूर्वक वापर तर करण्यात आला नाही ना असा प्रश्न चर्मकार समाज बांधवांपुढे उभा राहिला आहे.
तशी चर्चा समाजात होत असल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात असून त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या शिर्षकस्थानी असलेल्या नावामध्ये सुधारणा करण्यात येऊन त्याऐवजी श्री संत रोहिदास महाराज आर्थिक विकास महामंडळ असे करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांना श्री संत रोहिदास महाराज तिर्थक्षेत्र नांदेडचे संस्थापक सचिव वामनराव मे. विष्णुपूरीकर यांच्याकडून पाठविण्यात आले आहे.