नांदेड/मुंबई, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिर भागात पोलीस चौकी उभारण्यात यावी आणि पोलीस ठाण्यातील संख्याबळ वाढवावे अशी मागणी हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ मतदार संघाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्याकडे निवेदन देऊन गुरुवार दि.३ मार्च रोजी केली आहे.
हदगाव विधानसभा असलेल्या या माझ्या मतदार संघाचे हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात गत काही महिन्यापासून मोठया प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात भरदिवसा खून, चोरीचे प्रमाण प्रामुख्याने वाढले आहे. गत दोन ते तीन महिन्यात शहर व ग्रामीण भागात तीन ते चार खुनाच्या घटना घडल्यामुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरासह ग्रामीण भागात अवैद्य दारू,चो-याचे प्रमाण वाढल्यामुळे त्यातून गंभीर गुन्हे घडत आहेत.
हिमायतनगर पोलीस स्टेशनमधील मंजूर पोलीस कर्मचारी क्षमतेपेक्षा खूप कमी असल्याने त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास पोलीस प्रशासन कमी पडत आहे. नुकत्याच ४ ते ५ महिन्यात घडलेल्या घटनावरून शहरात व परिसरात जनतेत भितीचे वातावरण पसरल्याने गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी पोलीस कर्मचा-यांची संख्या वाढवून श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर परिसरात नवीन पोलीस चौकी उभारण्याची मागणी जनतेकडून होत आहे. त्या अनुषंगाने कृपया हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरीता पोलीस कर्मचा-यांची संख्या वाढवून परमेश्वर मंदिर हिमायतनगर परिसरात नवीन पोलीस चौकी उभारन्यात यावी आणि त्याचे आदेश संबंधितांना व्हावेत अशी विनंतीही आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे.